Nashik News : भारतीय मजदूर संघ महागाईच्या विरोधात 9 मे रोजी करणार राज्यभर निदर्शने

एमपीसी न्यूज – गेल्या सात-आठ महिन्यांपासून महाराष्ट्रातील जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्या असून मोल मजुरी करणाऱ्या सामान्य कामगारांना जीवनावश्यक घटक अन्न धान्य, प्रवास, शैक्षणिक खर्च, औषध उपचाराचा खर्च भागविणे मिळणा-या उत्पन्नात, पगारात जिकिरीचे झाले आहे. आर्थिक परिस्थिती पूर्णपणे ढासळली आहे, सामान्य माणूस या महागाईने मेटाकुटीला आलेला आहे तरी सरकारने या महागाईवर त्वरित अंकुश लावावा त्यासाठी पेट्रोलियम पदार्थ, अन्नधान्य, खाद्यतेल, स्वयंपाकाचा गॅस, भाजीपाला या वस्तूंच्या किमती त्वरित कमी करण्यात याव्या या मागणीसाठी भारतीय मजदूर संघ 9 मे 2022 रोजी राज्यभर निदर्शने करणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने कामगारांनी सहभागी व्हावे असे आवहान भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल ढुमणे यांनी महाराष्ट्र प्रदेशाच्या कार्यकारिणी सभेच्या समारोपात केले.

23 व 24 एप्रिल रोजी भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाची कार्य समितीची सभा नाशिक येथे संपन्न झाली. या सभेत महागाईच्या विरोधात ठराव करण्यात येऊन विविध जिल्ह्यात लक्षवेधी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल गॅस यांच्या किमती अन्य राज्यापेक्षा प्रचंड जास्त आहेत या वाढत्या किमतीमुळे प्रवास खर्चात प्रचंड वाढत असून याचा परिणाम सर्व वस्तूंचे भाव वाढवण्यात झाला आहे. अन्य राज्यांनी पेट्रोलियम पदार्थाच्या किंमत कमी केलेले असताना महाराष्ट्रात् मात्र त्या कमी केल्या जात नाही. त्यातच गेली पाच महिने एसटीचा कामगारांच्या संप सुरू होता. या काळात सामान्य प्रवाशांची खाजगी वाहतूकदारांनी अव्वाच्या सव्वा भाडे आकारून प्रवाशांची प्रचंड लूट करण्यात आली. त्यातच कोरोनामुळे लोकांचे गेलेले रोजगार अजूनही पूर्ववत सुरू झालेले नाही. ऊद्योग क्षेत्रात बेरोजगारीचे प्रमाणही मोठे आहे.

या सर्व परिस्थितीत सामान्य कामगार, मजूर वाढत्या महागाईने बेजार झाला आहे. सरकार मात्र त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. वाढत्या महागाईमुळे राज्यातील नागरिकांचा रोष सरकारवर निर्माण झाला आहे. सरकारने राज्यातील कामगारांना नागरिकांना महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी सकारात्मक योजनांची अंमलबजावणी केली पाहिजे व दिलासा दिला पाहिजे अन्यथा कामगारांना रत्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही असे प्रतिपादन सरचिटणीस मोहन येणूरे यांनी केले.

या बैठकीस क्षत्रिय संघटन मंत्री सी व्ही राजेश, अध्यक्ष अनिल ढुमणे, सरचिटणीस मोहन येणूरे, अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघाचे संघटनमंत्री विलासराव झोडगेकर, उद्योग प्रभारी चंद्रकांत धुमाळ, केंद्रीय सेक्रेटरी निलिमा चिमोटे, संघटन मंत्री श्रीपाद कुटासकर, अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे, सचिव विशाल मोहिते, प्रवीण अमृतकर, पुणे विभाग प्रमुख अर्जुन चव्हाण, पुणे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब भुजबळ व विविध ऊद्योगातील पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी यांनी चर्चेत सहभागी होवून विविध विषयांवर लक्षवेधी आंदोलनात सहभागी होण्यासाठी निर्धार व्यक्त केला.

संघटीत, असंघीटत कामगार, कंत्राटी कामगार, घरेलु कामगार, बांधकाम कामगार, सरकारने संसदे मध्ये मंजूर केलेल्या कोड बिलातील त्रुटी, राज्य सरकारचे रूल्स मधील कामगार हिताचे बदल, 18 ऊद्योगातील कामगारांचे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या किमान वेतनात सुधारणा, ई एस आय दवाखाने व सुविधा, किमान पेन्शन 5000 रुपये प्रती महिना, बिडी कामगारांना रोजगार व किमान वेतन, कंत्राटी कामगारांना रोजगारात संरक्षण, कंत्राटदार विरहित रोजगार, शेत मजुर, उसतोडणी कामगार, ई ऊद्योगातील कामगारांचे प्रश्नांबाबत 21 डिसेंबर 2022 रोजी मुंबई येथे राज्यव्यापी भव्य मोर्चा काढण्याची घोषणा भारतीय मजदूर संघाच्या कार्यकारिणी मध्ये अध्यक्ष अनिल ढुमणे व सरचिटणीस मोहन येणूरे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.