Pune News : उपमहापौरपदावरून आरपीआयमध्ये अंतर्गत वाद !

एमपीसी न्यूज : भाजपाकडून पुणे महापालिकेच्या सभागृह नेते आणि उपमहापौरपदात बदल केला जात आहे. सभागृह नेते बदलल्या नंतर उपमहापौरपद पुन्हा आरपीआयला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतू, आरपीआयमध्ये या पदावरून अंतर्गत वाद निर्माण झाला आहे. यावेळी अल्पसंख्यांक सदस्याला संधी देण्याची मागणी एका गटाने केली आहे.पदावरून अंतर्गत उफाळून आलेला हा वाद केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यापर्यंत पोचला आहे. 

महापालिकेत भाजपा-रिपब्लिकन पक्षाची युती आहे. पद वाटपात उपमहापौरपद रिपब्लिकनच्या वाट्याला आले आहे. डॉ. सिद्धार्थ धेंडे उपमहापौरपदी होते. गेल्या वर्षी पद बदल झाल्यानंतर हे पद भाजपाने आपल्याकडे ठेवून घेतले होते. नाराज झालेल्या आरपीआयला पुढील वर्षी पुन्हा पद देण्याचे आश्वासन भाजपाने दिले होते. उपमहापौर बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर हे पद पुन्हा आरपीआयकडे देण्यात आले आहे.

दरम्यान, मागील वर्षी आरपीआयने पालिकेतील गटनेतेपद सुनीता वाडेकर यांना दिले होते. तर, स्थायी समिती सदस्यपद हिमाली कांबळे यांना देण्यात आले होते. त्यामुळे रिपाईच्या एकमेव अल्पसंख्याक नगरसेविका फरजाना शेख यांनी उपमहापौरपदावर दावा सांगितला आहे. आरपीआयमधील एक गट शेख यांच्या बाजूने उभा राहिला असून त्यांनी सुनीता वाडेकर यांच्या नावाला विरोध सुरू केला आहे. हा वाद राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्यापर्यंत गेला असून त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना सामोपचाराने मार्ग काढण्याच्या सूचना दिल्याचे पक्षाच्या उच्चपदस्थ विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

या संदर्भात नगरसेविका फरजाना शेख म्हणाल्या, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या पत्रावर रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली असून या पक्षात सर्व जाती धर्मातील लोकांना समान न्याय दिला जातो असे म्हटले जाते. या पक्षात बौद्ध समाजबरोबरच मातंग ,मुस्लिम व इतर दलित जातीचेही कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात वर्षानुवर्ष काम करीत आहेत. त्यामुळे अल्पसंख्याक समुदायाला न्याय मिळेल अशी आशा वाटते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.