India Corona Update : बाधितांची संख्या 98 लाखांच्या पुढे तर, 93 लाखांहून अधिक झाले कोरोनामुक्त 

एमपीसी न्यूज – देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 98 लाखांच्या पुढे गेली आहे. तर, एकूण बाधित रुग्णांपैकी 93 लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.88 टक्के एवढं झाले आहे. 

मागील 24 तासांत देशभरात 30 हजार 5 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. या वाढीमुळे देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 98 लाख 26 हजार 775 एवढी झाली आहे. तसेच, गेल्या 24 तासांत 33 हजार 494 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून देशातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या 93 लाख 24 हजार 328 एवढी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या कमी होत असून सध्या 3 लाख 59 हजार 819 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात आतापर्यंत 1 लाख 42 हजार 628 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. मागील 24 तासांत देशभरात 442 रुग्ण दगावले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.45 टक्के एवढा आहे.

आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 15 कोटी 26 लाख 97 हजार 399 नमूने तपासण्यात आले आहेत, त्यापैकी 10 लाख 65 हजार 176 नमूने शुक्रवारी (दि.11) तपासण्यात आले आहेत.

ब्रिटननंतर आता अमेरिकेनंही फायझर आणि जर्मन फार्मा कंपनी बायोएनटेकद्वारे विकसित करण्यात येत असलेल्या कोरोना लसीच्या आपात्कालिन वापरास परवानगी दिली आहे. अमेरिकेने करोनावरील लस तयार करणारी कंपनी मॉडर्नाकडूनही शंभर दशलक्ष डोस विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, शुक्रवारी अमेरिकन सरकारच्या सल्लागार समितीनं फायझरच्या करोना लसीच्या आपात्कालिन वापरास परवानगी दिली. सध्या फायझरच्या लसीला मिळालेली परवानगी ही अंतरिम परवानगी आहे. कंपनीला अमेरिकेत लसीची विक्री करण्यासाठी आणखी एकदा अर्ज करावा लागणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.