IPL 2021: बातमी आयपीएलची – पंजाब के शेर हो गये ढेर! कोलकाताने पाच गडी राखून केले पराभूत

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी)- आयपीएलच्या तेविसाव्या सामन्यात काल कोलकाता संघाने पंजाब किंग्ज विरुद्ध खेळताना प्रत्येक क्षेत्रात वरचढ कामगिरी करत या स्पर्धेतला आपला दुसरा विजय मिळवताना आपली आशा सुध्दा जिवंत ठेवली.

आतापर्यंत मुंबई आणि चेन्नई मध्ये झालेल्या सामन्यानंतर आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी मैदानावर झालेल्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार आयन मॉर्गनने नाणफेक जिंकून पंजाब किंग्ज संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.

मागच्या वर्षीच्या स्पर्धेत सर्वात जास्त धावा करणाऱ्या के एल राहुलची कामगिरी या स्पर्धेत अगदीच वाईट नसली तरी तो आपल्या लौकिकाला चपखल जागलाय असे सुद्धा म्हणता येणार नाही, इतपत त्याची कामगिरी भरीव नाही. आजही तो केवळ 19 धावा करून पॅट कमिन्सची शिकार झाला, तर त्याचा साथीदार मयंक अगरवाल सुद्धा 31 धावा करून सुनील नारायणच्या गोलंदाजीवर बाद झाला.

पाठोपाठ युनिव्हर्सल बॉस ऑफ 2020 म्हणून ओळखला जाणारा ख्रिस गेल तरुण शिवम मावीने यष्टीमागे कार्तिकच्या हाती झेलबाद करून शून्यावर बाद करून पंजाब किंग्जला फार मोठा धक्का दिला. ज्यातून पंजाब संघाचा डाव सावरलाच नाही. निकोलस पुरन, हेन्रीक्स, शाहरुख खान अशी मोठमोठी नावे लक्षण खोटे करून तंबूत आले अन गेले ज्यामुळे पंजाब संघ केवळ 123च धावा करू शकला.

ख्रिस जॉर्डनने मात्र तडाखेबंद फलंदाजी करताना अठरा चेंडूत तीन षटकार मारत संघाची शंभरी तरी होईल याची खबरदारी घेतली,मात्र त्याला साथ न मिळाल्याने संघ 123 च धावा काढू शकला. प्रसिद्ध कृष्णाने तीन तर पॅट कमिन्स व सुनील नारायणने दोन दोन बळी मिळवून कोलकाताच्या बॉलिंग फॉर्मात आल्याचे दाखवून दिले.

120 चेंडूत 124 धावा या फॉरमॅट मध्ये फार कठीण मानल्या जात नाहीत, पण क्रिकेट मध्ये बऱ्याचदा चमत्कार होतात,तसाच यावेळीही व्हावा अशी अपेक्षा के एल आणि पंजाब किंग्जचे समर्थक करत होते, मात्र कोलकाता संघही आज विजय मिळवायचाच या हेतूने खेळणार हे कळत होतेच. मात्र युवा भावी सचिन म्हणून समीक्षक ज्याच्याकडे बघतात तो शुभमन गील, नितीश राणा आणि आक्रमक सुनील नारायण हे तिघेही संघाच्या केवळ सतराच धावा फलकावर झळकत असताना तंबूत परतले आणि पंजाबी समर्थक चमत्कार होणार असेच समजू लागले.

मात्र राहुल त्रिपाठी आणि कर्णधार मॉर्गनने मात्र जणू या विकेट्स पडलेल्या आहेत हे विसरूनच आश्वासक खेळ सुरू केला.राहुल त्रिपाठी, मॉर्गनच्या तुलनेत जास्त चांगले खेळत होता. मात्र दीपक हुडाने त्याला 41 या वैयक्तिक धावसंख्येवर बाद करत पुन्हा एक अंधुकशी का असेना पण आशा दाखवली, त्यातच आंद्रे रसेल ही धावबाद झाला. पण मॉर्गन आणि दिनेश कार्तिक या आजी माजी कर्णधार दुकलीने अधिक पडझड न होवू देता विजय मिळवून तर दिलाच पण या स्पर्धेतले आपले आव्हान सुद्धा जिवंत ठेवले.

मॉर्गनने नाबाद राहत 40 चेंडूत 47 धावा केल्या, ज्या त्याच्या फोर्मबद्दल होणाऱ्या नकारात्मक चर्चेला काही प्रमाणात तरी थांबवून ठेवतील. त्याच्या या कर्णधाराच्या खेळीला मिळालेला सामनावीर पुरस्कार म्हणूनच त्यावर शिक्कामोर्तब करून गेला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.