Pimpri Crime News : वाहतूक विभागाच्या कार्यालयात पोलीस कर्मचारी महिलेची गचांडी पकडून मारहाण; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका रिक्षाचालकावर कारवाई करत असताना वाहतूक विभागाच्या कार्यालयात येऊन एकाने राडा घातला. नियमभंग करणाऱ्या रिक्षाचालकावर कारवाई करत असलेल्या पोलीस कर्मचारी महिलेला शिवीगाळ करत त्यांची गचांडी पकडली. तसेच पोलीस कर्मचारी महिलेला मारहाण देखील केली. हा प्रकार सोमवारी (दि. 26) सकाळी पिंपरी वाहतूक विभाग कार्यालय येथे घडला. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

प्रल्हाद रामभाऊ कांबळे (वय 51, रा. कामगार भवन समोर, पिंपरी), रिक्षाचालक अहनद मौल शेख (वय 33) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत संबंधित पोलीस कर्मचारी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस कर्मचारी महिला सोमवारी सकाळी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात वाहतूक नियमनाचे काम करत होत्या. त्यावेळी आरोपी अहनद शेख नेहरूनगर येथून आंबेडकर चौकाकडे रिक्षा (एम एच 14 / एच एम 9078) चालवत विरुद्ध दिशेने आला. त्यामुळे फिर्यादी यांनी त्याला थांबवून त्याच्याकडे कागदपत्रांची मागणी केली.

मात्र आरोपी रिक्षा चालकाने कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे फिर्यादी यांनी रिक्षाचालकाला पिंपरी वाहतूक विभागाच्या कार्यालयात आणले. तेथे त्याच्यावर खटला भरण्याचे कायदेशीर काम सुरू होते. त्यावेळी आरोपी प्रल्हाद कांबळे तिथे आला. ‘आत्तापर्यंत तुम्ही किती वाहनांवर कारवाई केली याची माहिती मला तात्काळ द्या. तुम्ही हे कशासाठी करता मला चांगले माहिती आहे. पोलीस लाचार आहेत. आम्हाला इथे कशासाठी आणले ते मला माहिती आहे.’ असे म्हणून आरोपी प्रल्हाद याने आरोपी रिक्षाचालकाला ‘तू जा रे इथून ही काय करते मी पाहतो.’ असे म्हणून पळवून लावले.

त्यावेळी फिर्यादी या आरोपी रिक्षाचालकाला पकडण्यासाठी धावल्या असता आरोपी प्रल्हाद याने फिर्यादी यांची गचांडी पकडून त्यांना मारहाण केली. तसेच त्यांच्याशी गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला. वाहतूक विभागाच्या कार्यालयासमोर सार्वजनिक ठिकाणी थांबून आरोपी प्रल्‍हाद याने पोलीस कर्मचारी महिलेला शिवीगाळ केली असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

याबाबत भारतीय दंड विधान कलम 354, 353, 332, 294, 323, 279, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.