IPL 2023 – गुजरात टायटन्सचा हैदराबादवर 34 धावांनी विजय.

या विजयासह प्ले ऑफ साठी पात्र ठरलेला पहिला संघ.

एमपीसी न्यूज : (विवेक कुलकर्णी) गतविजेत्या गुजरात टायटन्सने धडाकेबाज खेळ करत सनरायजर्स हैदराबाद संघाचा 34 धावांनी  पराभव करत आपली विजयी घोडदौड चालूच ठेवत प्ले ऑफ मधले आपले स्थानही पक्के केले आहे.  त्याचवेळी सनरायजर्स हैदराबाद संघाचा निराशाजनक प्रवास आजही तसाच राहिल्याने त्यांचा आयपीएल 2023 चा प्रवास जवळपास संपुष्टात (IPL 2023) आला आहे.

अंकतालिकेत नंबर 1 वर असलेल्या आणि गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि यावर्षीच्या आयपीएलमध्ये 9व्या नंबरवर असलेल्या सनरायजर्स हैदराबाद या दोन संघातला आयपीएल 2023 च्या 16 व्या हंगामातला आजचा पहिला अन एकूण 62 वा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर खेळला गेला. ज्यात सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार एडियन मार्करमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

प्रथम फलंदाजीसाठी पाचारण करण्यात आलेल्या गुजरात टायटन्सच्या डावाची सुरुवात युवा शुभमन गील आणि अनुभवी वृद्धीमान साहाने केली,पण गुजरातच्या डावाच्या तिसऱ्याच चेंडूवर  भुवनेश्वरने साहाला अभिषेक शर्माच्या हातुन झेलबाद करून चांगलीच सनसनाटी निर्माण केली, पण गील आणि साईसुदर्शन या जोडीने नंतर अतिशय जबरदस्त फलंदाजी करत हैदराबाद संघाला हा आनंद उपभोगू दिलाच नाही.

गील तर अतिशय तोडफोड पण तितकीच आकर्षक फलंदाजी करत होता. अतिशय कमी कालावधीत तो मुख्य भारतीय संघाचा मुख्य घटक बनला आहे, याची सुखद प्रचिती त्याच्या नितांतसुंदर फलंदाजीमुळे त्याच्या चाहत्यांनी अनुभवली आहे. तोच फॉर्म त्याने या आयपीएलमध्येही तसाच चालू ठेवला आहे. आजही त्याने एकदम सुंदर फटकेबाजी करत आपले आणखी एक अन तेही वेगवान अर्धशतक पूर्ण केले.

Chinchwad : आमदार महेश लांडगे यांचा ‘तो’अधिकार आहे – उपमुख्यमंत्री

त्याच्या या फटकेबाजीमुळे साईसुदर्शनही भरात आला आणि या जोडीने आधी अर्धशतकी अन मग शतकी भागीदारी करुन हैदराबाद संघाची गोलंदाजी फोडून काढली. 26 चेंडूत 50 तर बरोबर 60 चेंडूत नाबाद शतकी सलामी देत त्यांनी गुजरात टायटन्स आज मोठ्या धावसंख्येची आरास रचणार याचा इशारा दिलाच होता.

गीलने केवळ 23 चेंडूत अर्धशतक पूर्ण केल्यानंतर त्याने जास्तच आक्रमक अंदाजात पुढे खेळायला सुरुवात केली.त्याच्या या खेळीसमोर साईसुदर्शन या डावखुऱ्या फलंदाजानेही चांगली फलंदाजी करत सर्वाना प्रभावित केले, पण तो आपले अर्धशतक पूर्ण करण्यात अपयशी ठरला आणि 47 धावांवर असताना एक मोठा फटका मारण्याच्या नादात यांसेनच्या गोलंदाजीवर नटराजनच्या हातात झेल देवून बाद झाला.

या धावा 36 चेंडूत आल्या. त्यात सहा चौकार आणि एक षटकार सामील होता. याचबरोबर त्याने गील सोबत दुसऱ्या विकेटसाठी 147 धावांची मोठी भागीदारीही केली. यानंतर आलेल्या पांड्यालाही फारसे योगदान न देताच तंबूत परत पाठवले, त्याला भुवनेश्वरने बाद केले, पांड्याने फक्त 8 धावा काढल्या.

काही वेळापूर्वीच 230 धावसंख्येकडे सहज कूच करतोय असे वाटत असतानाच हैदराबाद संघाने गुजरात संघाच्या फलंदाजांना काहीसा अंकुश लावलाय असे वाटत होते. त्यातच पंड्यापाठोपाठ मिलर, तेवतीयाही आले अन गेले आणि मग गुजरात टायटन्स 200 तरी करेल का अशी शंका वाटू लागली, पण या पडझडीतही गीलने शुभ खेळ करत केवळ 56 चेंडुत आपले आयपीएलमधले पहिले शतक पूर्ण केले. या शतकी खेळीत 13 चौकार आणि एक षटकार सामील होता.

त्याचे आता जवळपास सर्वच फॉरमॅटमध्ये शतके झालेली आहेत. शतक झाल्यानंतर तो लगेचच भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर बाद झाला. पुढच्या चेंडूवर रशीद खान यष्टीरक्षकाच्या हातात झेल देवून बाद झाला. यामुळे हॅट्रीकची संधी भुवनेश्वरला मिळाली होती. पण त्याला हॅटट्रिक जरी मिळवता आली नसली तरी त्याने नूर अहमदला धावबाद करून संघाला हॅटट्रिक मिळवून दिली,शेवटच्या षटकात भुवनेश्वरने आपला अनुभव पणाला लावत अप्रतिम गोलंदाजी करत फक्त 1 धाव देत तीन गडी बाद केले. अन आपल्या वैयक्तिक 5 विकेट्सही ज्या त्याने फक्त 30 धावा देत मिळवल्या. त्याच्याच भेदक गोलंदाजीमुळे 220 ते 230 धावांकडे सहज जाईल असे वाटत असलेल्या गुजरात टायटन्सला फक्त 188 धावांवरच समाधान मानावे लागले.

Chinchwad : वज्रमुठीला अगोदरच तडे गेले आहेत – फडणवीस

गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीला चार चांद लावायची जबाबदारी आता फलंदाजांवर होती मात्र सुरुवात तरी तशी झाली नाही.  इम्पॅक्ट प्लेयर म्हणून घेतलेला अनमोलसिंग आज तरी संघासाठी ना तसा खेळाडू ठरला ना काही अनमोल योगदान देवू शकला. मोहम्मद शमीने त्याला 5 धावांवर असताना राशीद खानच्या हातून झेलबाद करवले, तर पुढच्याच षटकात यश दयालने अभिषेक शर्माला यष्टीमागे साहाच्या हातून बाद करत दुसरा धक्का दिला.

अन यातून सावरण्याआधीच शमीने राहुल त्रिपाठीला बाद करत हैदराबाद संघाला मोठ्याच अडचणीत आणले. तिसऱ्या षटकाखेरीस हैदराबाद संघाची धावसंख्या होती 3 बाद 12. यामुळे हैदराबाद संघ मोठ्याच संकटात आहे असे वाटत होते, अन असेच घडलेही. कर्णधार मार्करम आणि आक्रमक समदही विशेष योगदान न देता तंबूत परतले अन हैदराबाद संघ मोठ्याच फरकाने आज पराभूत होणार हे स्पष्ट झाले.

तसेच झालेही असते, मात्र हेन्रीक क्लासेनने थोडीफार जिद्द दाखवत लढाई सुरू ठेवली. त्याला दुसऱ्या बाजूने जराही मोठी(अपवाद भुवनेश्वरचा) साथ न मिळाल्याने हैदराबाद संघ सामन्यात कधीही यश मिळवेल असे वाटलेच नाही. क्लासेनने मात्र जबरदस्त विजिगिशु वृत्तीचे प्रदर्शन करत झुंजार खेळ करत 64 धडाकेबाज धावा केल्या.

त्याला शमीने बाद करत सामन्यातला चौथा गडी बाद करून भुवनेश्वर पाठोपाठ जबरदस्त गोलंदाजी करत ओल्ड इज गोल्ड याची सुखद प्रचिती दिली. भुवनेश्वरने तर गोलंदाजी पाठोपाठ फलंदाजीतही आपले योगदान दिले. पण त्याचीही झुंजार खेळी मोहित शर्माने समाप्त करत आपला चौथा बळी प्राप्त केला. महत्वाचे खेळाडू स्वस्तात बाद झाल्यानंतरही क्लासेन, भुवनेश्वर अन मार्कंडे यांनी दाखवलेल्या जिद्दीमुळे गुजरात संघाला फक्त 34 धावांनीच विजय (IPL2023) मिळवता आला.
शुभमन गीलला त्याच्या शतकी खेळीने सामन्यातला सर्वोत्तम खेळाडू हा बहुमान मिळाला.

संक्षिप्त धावफलक –
गुजरात टायटन्स
9 बाद 188
गील 101,साई सुदर्शन 47,पंड्या 8,शनाका नाबाद 9
भुवनेश्वर 30/5,फारुकी 30/1,नटराजन 34/1
विजयी विरुद्ध
सनरायजर्स हैदराबाद
9 बास 154
मार्करम 10,क्लासेन64 ,समद 4,भुवनेश्वर 27
शमी 20/4,मोहित 28/4

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.