Chinchwad News : पवना नदीच्या आरतीने जलदिंडीची सांगता

जलदिंडी प्रतिष्ठानचा पुरस्कार ओंकार गौरीधर यांना तर उज्वला कुलकर्णी यांचा पर्यावरण मित्र पुरस्काराने गौरव

एमपीसी न्यूज – जलदिंडी प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी केली जाणारी जलदिंडी यावर्षी अगदी सध्या पद्धतीने पार पडली. कोणाही निमंत्रितांना न बोलावता, तसेच नदीमध्ये बोटी न टाकता यावर्षी जलदिंडी काढण्यात आली. पवनानगर येथून जलदिंडीला सुरुवात झाली. तर चिंचवडगाव येथील पवना नदीच्या घाटावर पवना नदीच्या आरतीने जलदिंडीची सांगता झाली. यावर्षीचा जलमित्र पुरस्कार ओंकार गौरीधर यांना तर पर्यावरण मित्र पुरस्कार उज्ज्वला कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला.

दरवर्षी जलदिंडी पवना नदीतून बोटीतून केली जाते. मात्र, यावर्षी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर नदीमध्ये बोटी टाकल्या नाहीत. पवनानगर येथे सुरुवातीला पवना नदीची पूजा करण्यात आली. ज्ञानप्रबोधिनीच्या शिक्षिका मनीषा वहिले यांनी आयोजन केले. यावेळी सरपंच ज्ञानेश्वर कालेकर, संदीप भुतडा, शाळेचे प्राचार्य ठाकर उपस्थित होते. जलदिंडीतर्फे प्रवीण लडकत, राजीव भावसार, व्यंकटेश भताणे, राजन वडके यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आरती, प्रतिज्ञा, दिवे सोडणे आणि पवना नदीची ओटी भरण्याने या वर्षीच्या जलदिंडीला सुरुवात झाली.

त्यानंतर थुगाव येथे छाया मुंढे जिजाबाई पोटफोडे, सरपंच सावित्राबाई सावंत यांच्या उपस्थितीत पवना नदीची आरती, पूजा आणि दिवे सोडण्याचा कार्यक्रम झाला. व्यंकटेश भताणे यांनी पवना नदीचे महत्व यावेळी समजावून सांगितले. शिवणे घाटावर धनंजय टिळे यांनी मनोगत व्यक्त केले. तिथेही पवना नदीची आरती, प्रतिज्ञा, पूजा करण्यात आली. शालिनी गोसावी यांनी सूत्रसंचालन केले.

बेबेडओहळ आणि त्यानंतर गोडुम्ब्रे येथे पवना नदीची पूजा, आरती झाली. तिथून जलदिंडी चिंचवडगाव येथील जिजामाता उद्यान येथील घाटावर आली. जिजामाता उद्यान येथील घाटावर जलदिंडीचे प्रवर्तक डॉ. विश्वास येवले यांनी मनोगत व्यक्त केले. जलदिंडी तर्फे प्रवीण लडकत, अजित नेचील, सुनील घाडगे, तेजस्विनी सवाई, राजू भालेकर, राजन वडके, जयंत बाहेकर, लक्ष्मीकांत भावसार, राजीव भावसार, लायन्स क्लबचे श्री व सौ कुलकर्णी, सावरकर मित्र मंडळ आणि अन्य संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

चिंचवडगाव येथील घाटावर जलदिंडी प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा जलमित्र पुरस्कार उद्योजक ओंकार गौरीधर यांना देण्यात आला. ओंकार गौरीधर 2008 पासून जलदिंडी अभियानाशी जोडले गेले आहेत. तर फिनिक्स पुणेच्या अध्यक्षा उज्ज्वला कुलकर्णी यांना पर्यावरण मित्र पुरस्कार देण्यात आला.

याच वेळी केजूबाई बंधारा येथे थेरगाव सोशल फाउंडेशन आणि सोसायटी फेडरेशनने पूजा केली. तर जाधव घाटावर रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी यांनी आरती केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.