Talegaon : कलापिनी आयोजित पर्यावरण पूरक शाडू माती गणपती बनविण्याची कार्यशाळा उत्साहात

​एमपीसी न्यूज – गेली 7 वर्षे मिळालेला उदंड प्रतिसाद लक्षात घेऊन रविवारी (दि. 2) कलापिनी सांस्कृतिक केंद्रात कलापिनीच्या वतीने पर्यावरण पूरक शाडू माती गणपती बनविण्याची कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. 

मूर्तीकार अशोक नानिवडेकर व अंतर्गत सजावटकार ज्योती देशपांडे यांनी शाडूची माती मळणे, मूर्तींच्या अवयवांना आकार देणे व कलाकुसर करणे या गोष्टीचे प्रशिक्षण सहभागी पर्यावरण प्रेमी नागरिक व बाल कलाकारांना दिले. या कार्यशाळेत ४० बाल, तरुण आणि प्रौढ पर्यावरण प्रेमींनी सहभाग घेऊन स्वहस्ते गणेश मूर्ती तयार केल्या.

सर्व सहभागी प्रशिक्षणार्थींचा उत्साह छान होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्वनिर्मितीचा आनंद ओसंडून वाहत होता. तयार झालेल्या मूर्ती रंगविल्यावर घरी स्थापना करणार असल्याचे मनोगत सहभागी व्यक्तींनी केले.

कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी रामचंद्र रानडे आणि अशोक बकरे आणि कलापिनीच्या युवा कलाकारांनी  परिश्रम घेतले कलापिनीचे विश्वस्त डॉ. अनंत परांजपे आणि ज्येष्ठ रंगकर्मी विश्वास देशपांडे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.