Kamshet Crime News : आरोपीच्या जामिनासाठी लाच स्वीकारणाऱ्या पोलीस निरीक्षकासह दोघे ‘एसीबी’च्या जाळ्यात

एमपीसी न्यूज : न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीचा जामीन करण्यासाठी ५ लाखाच्या लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक व एका पोलीस कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पथकाने एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. 

ही कारवाई शनिवारी (दि.6) दुपारी सव्वातीनच्या वाजण्याच्या सुमारास कामशेत येथे झाली. आरोपींनी तक्रारदाराकडून पाच लाख रुपयांपैकी एकूण साडेतीन लाख रुपयांची लाच घेतली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक अलका सरग यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक बाळासाहेब नेवाळे यांना दि.21 फेब्रुवारी रोजी गोवित्री संस्थेतील बनावट मतदार यादीत फसवणूक केल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. वडगाव मावळ न्यायालयाने त्यांना दि.25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली.

त्यांना न्यायालयात जामीनाबाबत मदत करण्यासाठी आरोपींनी 5 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानुसार दि.23 फेब्रुवारी रोजी आरोपींनी अडीच लाख रुपये घेतले. मात्र, 25 फेब्रुवारीला न्यायालयात जामीन मिळवून देण्यासाठी काहीच मदत केली नाही. त्यामुळे नेवाळे यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यांची येरवडा पुणे कारागृहात रवानगी झाली.

बाळासाहेब नेवाळे यांचा जामीन करण्यासाठी पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम व पोलीस कर्मचारी महेश दौंडकर यांनी काहीच मदत न केल्याने तक्रारदार यांनी त्यांना उर्वरित रक्कम देण्याचे टाळले. नेवाळे यांचा दि.10 मार्च रोजी जामीन असल्याने मदत करतो, असे म्हणून आरोपींनी उर्वरित अडीच लाख रुपयांच्या लाचेची मागणी तक्रादारांकडे केली.

त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयात तक्रार दिली.

तक्रारदाराकडून शनिवारी (दि.6) रोख एक लाख रुपये स्वीकारताना पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम व कर्मचारी महेश दौंडकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.त्यांची पाच तास चौकशी चालू आहे.

आरोपींवर कामशेत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पोलीस अधीक्षक राजेंद्र बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अलका सरग, सुनील क्षीरसागर, सुनील भिले, कर्मचारी वैभव गिरीगोसावी, रतेश थरकर, किरण चिमटे या पथकाने सापळा रचून कारवाई केली.

या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अलका सरग करत आहेत.

मावळ तालुक्यात महिला न्यायाधीश लाच प्रकरण ताजे असताना आता कामशेतचे पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक व पोलीस कर्मचारी यांच्यावर कारवाई झाली. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. मावळ तालुक्याला लागलेली भ्रष्टाचाराची कीड कधी संपणार, असा सवाल नागरिक करत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.