Nigdi News : समाजाला तुमच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटेल इतके कर्तव्य उंचावत नेत रहा – राजेश पाटील

आयुक्त राजेश पाटील यांचा "खान्देश रत्न" तर उपायुक्त प्रतिभा पाटील यांचा “खान्देश भूषण” पुरस्काराने गौरव 

एमपीसी न्यूज – माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक असतात. आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात, एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो. आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका, सामाजिक, राजकीय अथवा प्रशासकीय यापैकी कामाचे क्षेत्र कोणतेही असो जबाबदारी आणि कामगीरीतून समाजाला तुमच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटेल इतके कर्तव्य उंचावत नेत रहा, असे महापालिका आयुक्त् तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले.

1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस व महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस तसेच खान्देश मराठा मंडळाचा स्थापना दिवस एकत्रित साजरा करण्यात आला. या निमित्ताने मंडळाच्या आजीव सभासद व त्यांच्या कुटुंबीयांचा स्नेह मेळावा पार पडला. खान्देश मराठा मंडळाच्या निगडी येथील सांस्कृतिक भवनात हा कार्यक्रम घेण्यात आला. दरम्यान, मंडळाचा पहिलाच “खान्देश रत्न” पुरस्कार आयुक्त राजेश पाटील यांना देण्यात आला.

वाघोली येथील आनंदी घर वृद्धाश्रमाच्या संस्थापिका प्रतिभा पाटील तसेच आयुक्त्‍ राजेश पाटील यांच्या भगिनी पुणे महापालिकेच्या उपायुक्त प्रतिभा पाटील यांना “खान्देश भूषण पुरस्कार”  देवून गौरविण्यात आले. तर खान्देश विशिष्ट गौरव पुरस्कार ज्येष्ठ अहिराणी साहित्यिका डॉ. उषा सावंत यांना देण्यात आला. तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणारे प्रा.डॉ.किशोर पवार, डॉ. कुंदन पाटील, श्री. प्रदीप शिंदे, संदीप देवरे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

तसेच, 10 वी 12 वीच्या परीक्षेत गुण संपादित केलेल्या विद्यार्थ्यांचे तसेच मंडळाचे ज्येष्ठ नागरिक आणि मंडळासाठी काम करणारे पदाधिकारी यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. खासदार श्रीरंग बारणे, माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, प्रमोद कुटे, माजी नगरसेविका शर्मिला बाबर, राजेंद्र साळुंखे, मंडळाचे अध्यक्ष गुलाबराव पाटील यांच्यासह मधू पगार, बी. डी. पाटील, माधव पवार, बी. के. पाटील, गंगाराम पाटील, एस. आर. पाटील, भास्कर पाटील, कृष्णराव अहिरराव, अनिल सावंत, जयंत सिसोदे, संजय पाटील, महिला समिती पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने खान्देशी बांधव सहकुटुंब उपस्थित होते.

आयुक्त राजेश पाटील यांनी खान्देश ते आयुक्त पदापर्यंत पोहोचण्याचे प्रेरक अनुभव मांडले. जीवनात नैतिकता आणि नीतिमूल्ये महत्वाची असून ती घरातूनच मिळाली होती. स्वतःवर विश्वास यायला लागल्यावर यशही मिळत जाते. आपले वर्तनही असे हवे की आपल्याकडे बघून इतरांना प्रेरणा मिळाली पाहिजे. असे विचार त्यांनी मांडले. प्रा. डॉ. किशोर पवार, प्रतिभा पाटील यांनीही विचार व्यक्त केले.

खान्देश मराठा मंडळ आपल्या शहरात तसेच राज्य पातळीवरही समाजसेवेचे कार्य 1986 पासून अव्याहतपणे करत आहे. मान्यवरांकडून मंडळाच्या कार्याचे कौतुकही होत असते. कोरोना काळात सर्वकाही ठप्प असतांना खान्देश मराठा मंडळ शहरात समाजसेवेचे कार्य करत असल्याचे मत मंडळाचे अध्यक्ष गुलाबराव पाटील यांनी व्यक्त्‍ केले. तसेच, मंडळाच्या नवीन संकल्पित वास्तू बद्दल माहिती दिली. तसेच भव्य बारा मजली वास्तूचे संकल्प चित्र ही सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय पवार यांनी प्रास्ताविक संतोष पाटील तर आभार मधू पगार यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.