Pune News: किरीट सोमय्या हल्ला प्रकरण ; शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे यांच्यासह 60 ते 70 जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज: भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महानगरपालिकेत शनिवारी हल्ला करण्यात आलाय. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे यांच्यासह 60 ते 70 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. रात्री उशिरा गुन्हा दाखल केला असून, अद्याप कोणाला ताब्यात घेतली नाही. इतर आरोपींची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना केल्याचे पोलिसांनी सांगितले. 

शहरअध्यक्ष संजय मोरे, पदाधिकारी चंदन साळुंके, किरण साळी, सुरज लोखंडे, आकाश शिंदे, रूपेश पवार, राजेंद्र शिंदे, सनि गवते यांच्यासह ६० ते ७० महिला व पुरूष कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात प्रशांत लाडे (वय ३०) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, भादवी कलम १४३, १४७, १४९, ३४१, ३३६, ३३७, ३२३, ५०४ तसेच मु.पो.अॅक्ट कलम ३७(१) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जम्बो कोविड सेंटरमध्ये झालेल्या घोटाळाप्रकरणी महापालिका आयुक्तांची भेट घेण्यासाठी किरीट सोमय्या शनिवारी सायंकाळी पुणे महानगरपालिकेत आले होते. यावेळी शिवसैनिकांनी त्यांना अडवून त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. या वेळी झालेल्या झटापटीत किरीट सोमय्या महानगरपालिकेच्या पायऱ्यावरून घसरत खाली पडले. यावेळी त्यांच्या पाठीला जबर दुखापत झाली. त्यांना संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या सर्व प्रकरणानंतर शनिवारी रात्री भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक तक्रार देण्यासाठी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पोहोचले होते. यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हा तर किरीट सोमय्या यांना ठार मारण्याचा कट होता असा गंभीर आरोप केलाय. .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.