Lonavala : तिकोणा किल्ल्यावरुन पडल्याने एका युवकाचा मृत्यू; 250 फूट खोल दरीतून ‘त्या’ युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात शिवदुर्ग मित्रला यश

एमपीसी न्यूज – पवन मावळातील तिकोणा किल्ला (वितंडगड) या किल्ल्यावरुन आज (बुधवारी) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दरीत पडलेल्या युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात शिवदुर्ग मित्र या लोणावळ्यातील रेस्कू टिमला चार वाजण्याच्या सुमारास यश आले. वरण तळ्याची मागील बाजूच्या बुरुजवरून सुमारे 250 फूट खोल हा युवक पडला होता.

हार्दिक विक्रम माळी (वय 20, रा. इम्प्रेस टाॅवर, घोरपडी, पुणे) असे या युवकाचे नाव आहे.

तळेगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेणारे तीन युवक आज, बुधवारी (दि. 18) सकाळच्या सुमारास तिकोणा किल्ल्यावर फिरायला गेले होते. यावेळी हार्दिक माळी या युवकाचा वरण तळ्याच्या मागील बुरुजावरुन तोल गेला आणि तो तब्बल 250 फूट खाली पडला.

तिकोणा किल्ल्यावरील गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेच्या पदाधिका-यांना घटनेची माहिती मिळाली. त्यानुसार, मनोहर सुतार, गुरूदास मोहोळ व वनपाल यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सकाळपासून ‘त्या’ युवकाचा शोध घेतला. बराच वेळ शोध घेतला तरीही मृतदेह सापडत नव्हता.

त्यानंतर, या घटनेची माहिती शिवदुर्ग मित्र लोणावळा टीम आणि लोणावळा ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. सर्वजण गडावर दाखल झाले आणि एकत्रित शोधमोहीम सुरु केली. चार वाजण्याच्या सुमारास त्यांना दरीत मृतदेह मिळून आला. हार्दिक उंचावरून पडल्याने गंभीर जखमी होऊन मृतावस्थेत आढळून आला. त्याला ट्रॉलीच्या साहाय्याने किल्ल्यावर घेतले आणि तिथून गडाच्या खाली नेण्यात आले.

ओंकार पडवळ, रितेश कुडतरकर, हर्ष तोंडे, अनिल आंद्रे, शुभम आंद्रे, चंद्रकांत बोंबले, अशोक उंबरे, मनोज वरे, बाळू वरे, अजय शेलार, सतिश मालगोडे, राजेंद्र कडु, अनिल सुतार, आनंद गावडे, सुनिल गायकवाड, संतोष गोलांडे, आकाश मारने, सागर शिंदे, विशाल धुमाळ या शिवदुर्ग संवर्धन संस्थेच्या टीमने तसेच सुजीत मोहोळ, मनोज सुतार, प्रथमेश घोलप, सतीश मोहोळ, संदेश वरवे, अनंता खैरे पोलीस-पाटील. गुरुदास मोहोळ, शुभव वरवे, संतोष बोडके, योगेश पडवळ, किरण मोहोळ, शंकर मोहोळ, भिमराव मोहोळ, मारुती मोहोळ या स्थानिक नागरिकांनी हार्दिकचा मृतदेह बाहेर काढला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.