Lonavala : मळवली रेल्वेस्थानकाला अवैध धंद्यांचा विळखा

खुलेआम मटका,गांजी विक्री व वेश्याव्यवसाय

एमपीसी न्यूज- मळवली रेल्वे स्थानकाच्या परिसरात खुलेआम मटका खेळविला जात असताना रेल्वे पोलीस व लोणावळा ग्रामीण पोलीस प्रशासनांकडून यावर कसल्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.

अवैध धंद्यांमुळे युवा पिढी वाममार्गाला जात असताना या धंद्यांना आळा घालण्याऐवजी त्यांना बगल देण्याचे काम कायद्यांच्या रक्षणकर्त्यांकडूनच केले जात आहे. मागील काही वर्षांपासून पुणे जिल्ह्यात मटका बंदी असताना देखील लोणावळ्याजवळील मळवली रेल्वे स्थानकाच्या परिसरात खुलेआम मटका सुरु आहे. लोणावळा ते कामशेत दरम्यानचे नागरिक याठिकाणी मटका खेळण्यासाठी येत असतात. याचा त्रास हा स्थानिक नागरिकांसह याभागात पर्यटनाकरिता येणार्‍या पर्यटकांना होतो आहे.

रेल्वे पोलिसांच्या हद्दीत हा मटका खेळविला जात असताना आर्थिक हितसंबंधांमुळे संबंधित व्यावसायिकांवर कारवाई केली जात नसल्याची परिसरात चर्चा आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी देखील सदर मटका हा रेल्वे पोलिसांच्या हद्दीत असल्याने कारवाई करण्याचे टाळले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांकडून अवैध धंद्यांना आळा घालण्याकरिता मोठ्या प्रमाणात कारवाई मोहीम राबवली जात असताना रेल्वे पोलिसांकडून मात्र या मोहिमेला हरताळ फासला जात असल्याचे चित्र मळवलीत पहायला मिळत आहे. मटक्याप्रमाणेच या भागात वेश्याव्यवसाय तसेच अवैध गांजा विक्री होत असल्याने मळवळी स्थानकाच्या परिसरात अवैध धंद्यांचा विळखा पडला आहे.

लोणावळा रेल्वे स्थानक परिसरात गांजा विक्री

मळवळी प्रमाणेच लोणावळा रेल्वे स्थानक परिसरातील इंदिरानगर भागात खुलेआम गांजा विक्री केली जात असताना लोणावळा रेल्वे पोलीस व लोणावळा शहर पोलिसांकडून कारवाई केली जात नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

अवैध धंद्यावर कडक कारवाई करणार – इंगवले

मळवली भागात सुरु असलेल्या अवैध धंद्यावर यापूर्वी कारवाई करण्यात आली होती. नव्याने जर या भागात पुन्हा अवैध धंदे सुरु झाले असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करत ते बंद करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.