Lonavala : भारतातील पहिल्या ‘कोरोना टेस्ट किट’ची लोणावळ्यातील मायलॅब सोल्युशनमध्ये निर्मिती

ड्रग्ज कंट्रोल आँफ इंडियाची मान्यता; दररोज दहा हजार किटची करणार निर्मीती

एमपीसी न्यूज – कोरोना या आजाराच्या संसर्गाची अचूक माहिती देणारे किट लोणावळ्यातील मायलॅब डिसकव्हर सोल्युशन प्रा. लिमिटेड कंपनीने तयार केले आहे. या किटला ड्रग्ज कंट्रोल आँफ इंडियाने मान्यता दिली आहे. जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलेले असताना मायलॅब सोल्युशन कंपनीने बनविलेले सदरचे किट भारतामध्ये कोरोना संसर्गाची माहिती मिळविण्याकरिता उपयुक्त ठरणार आहे.

या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावळ, कार्यकारी संचालक शैलेंद्र कवाडे व वितरण विभागाचे प्रमुख राहूल पाटील म्हणाले, जगभरातील नऊ कंपन्यांना हे किट बनविण्याची मान्यता आहे. मायलॅब ही भारतामधील एकमेव कंपनी आहे.

जागतिक आरोग्य संघटना (डब्लूएचओ) च्या नियमांप्रमाणे विविध पातळ्यांवर तपासणी करुन हे किट बनविण्यात आले आहे. नांगरगाव औद्यागिक वसाहतीमधील मायलॅब मध्ये मागील सात ते आठ वर्षापासून विविध किट बनविण्यात येत असल्याने हे किट बनविण्यात फार काळ लागला नाही. आठ ते दहा दिवसात हे किट बनविण्यात आले. या किटला ‘ड्रग्ज कंट्रोल आँफ इंडिया’ची मान्यता मिळाली आहे.

सध्या दिवसाला दहा हजार किट बनविले जात आहेत. कामाची क्षमता वाढवून दिवसाला 25 हजार किट बनविण्याचा आमचा मानस आहे. जगभरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी संयशित व्यक्तीची तपासणी या किटच्या माध्यमातून करण्यात येईल. या किटमुळे संबंधित व्यक्तीला कोरोना झाला आहे का?, साधा व्हायरल फ्लू आहे का? याची माहिती समजणार असल्याने ते प्रभावी ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.