Lonikand : घरात शिरलेल्या दरोडेखोरांच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – घरात शिरलेल्या दरोडेखोरांचा प्रतिकार करताना दरोडेखोरांनी वृद्ध दाम्पत्यावर केलेल्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू झाला असून त्यांची पत्नी गंभीररित्या जखमी झालेली आहे. ही घटना आज (दि.18) मध्यरात्री दीडच्या सुमारास लोणीकंद येथील डोंगरगावमध्ये घडली.

केरबा भिवा गडदे (70) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव असून मुक्ताबाई केरबा गडदे (62) या गंभीर जखमी झाल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केरबा आपल्या पत्नी मुक्ताबाईसह घरात झोपले होते व दुसऱ्या खोलीत त्यांची सून छोट्या मुलासह झोपली होती. आज मध्यरात्री दीडच्या सुमारास दरोडेखोरांनी गडदे वस्तीतील केरबा यांच्या घरात शिरुन तीन चोरट्यांनी अचानक हल्ला केला व त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. केरबा व त्यांच्या पत्नीने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर केरबा यांच्या डोक्यावर दरोडेखोरांनी कुऱ्हाडीने वार केले व त्यातच केरबा यांचा जागीच मृत्यू झाला व पत्नी मुक्ताबाई यांच्यावर केलेल्या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या.

मुक्ताबाई यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व नाकातील नथ असा 60 हजार रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी हिसकावून नेला. घरातील गोंधळामुळे दुसऱ्या खोलीत झोपलेली त्यांची सून निर्मला जागी झाली मात्र दरोडेखोरांनी त्यांच्या खोलीला बाहेरुन कडी लावली होती. निर्मलाने वस्तीतील लोकांना फोन करुन बोलावून घेतले तेव्हा लोक येताना दिसताच चोरटे तेथून पसार झाले.

भिक्षेकऱ्याचे सोंग घेऊन दरोडेखोरांनी प्यायला केरबा गडदे यांच्या घरी चहा

गेल्या दोन दिवसांपासून भिक्षेकरी म्हणून गावात फिरणा-या दरोडेखोरांनी यापूर्वी देखील दोन ठिकाणी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. दरोडेखोर काल सकाळी साडेअकरा वाजता केरबा यांच्या घरी चहादेखील प्यायले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.