Maharashtra Corona Update : आज 3,900 नवे रुग्ण, मुंबईत 2,510 रुग्णांची नोंद; 85 ओमायक्रॉन बाधित

एमपीसी न्यूज – राज्यात पुन्हा एकदा कोरोना हातपाय पसरायला लागला आहे. मागील काही दिवसांपासून दैनंदिन रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, ही धोक्याची घंटा मानली जात आहे. कोरोनाच्या आकडेवारीत आज (बुधवारी) 3,900 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यापैकी 2,510 रुग्ण एकट्या मुंबईमधील आहेत. मंगळवारच्या तुलनेत मुंबईत आज 82 टक्के अधिक रुग्णवाढ नोंदविण्यात आली आहे तसेच 85 ओमायक्रॉन रुग्णांची देखील भर पडली आहे.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 66 लाख 65 हजार 386 एवढी झाली आहे. त्यापैकी 65 लाख 06 हजार 137 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज 1,306 बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.61 टक्के एवढा झाला आहे.

राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या पुन्हा वाढली असून, सध्या 14 हजार 065 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात 20 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे. राज्यात सध्या 1 लाख 22 हजार 906 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 905 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

आज दिवसभरात 85 नवीन ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे. यासह राज्यातील ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 252 एवढी झाली आहे. त्यापैकी 99 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.