Pimpri News : निवडणूक प्रक्रियेला सुरुवात; प्रभाग रचनेची सविस्तर माहिती 6 जानेवारीपर्यंत सादर करा; आयोगाचे आदेश

एमपीसी न्यूज – ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा तिढा कायम असला तरी राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरु केली आहे. आरक्षण निश्चितीसाठी प्रगणक गट (ब्लॉक)ची लोकसंख्या, भौगोलिक सीमा याची कागदोपत्री सविस्तर माहिती समाविष्ट करुन प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव तयार करुन 6 जानेवारी 2022 पर्यंत सादर करावा, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाचे प्रभारी सचिव अविनाश सणस यांनी आज (बुधवारी) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांना दिले आहेत.

निवडणूक आयोगाने 3 नोव्हेंबर 2021 रोजी तीनसदस्यीय पद्धतीने प्रभाग रचनेचा कच्चा प्रारुप आराखडा तयार करण्याचा आदेश महापालिकेला दिला होता. त्यानुसार महापालिका प्रशासनाने आराखडा तयार करुन 6 डिसेंबर रोजी आयोगाला पॅनड्राईव्हमध्ये सादर केला. त्यावर 11 डिसेंबर रोजी आयोगासमोर सादरीकरण झाले. त्यात आयोगाने काही दुरुस्त्या सुचविल्या होत्या.

राज्य शासनाने 15 डिसेंबर 2021 रोजी महापालिका (प्रभागांमध्ये राखीव जागांचे वाटप करणे आणि त्या जागा चक्रानुक्रमे फिरविण्याची पद्धत) नियम 2021 अन्वये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार (त्रिसदस्यीय) आरक्षण कशा पद्धतीने निश्चित करावे हे विहित केले आहे. अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला यांचे वाटप करण्याची पद्धत विहित केलेली आहे.

मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास अनुसरुन जोपर्यंत राज्य शासन त्रिस्तरीय चाचणी करुन स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागासप्रवर्गाचे प्रमाण निश्चित करत नाही. तोपर्यंत आगामी सार्वत्रिक, पोटनिवडणुकांमध्ये नागरिकांच्या मागासप्रवर्गाच्या जागा सर्वसाधारण म्हणून अधिसूचित करुन निवडणुका घेण्याचे आदेशित केले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता कोणत्याही जागा देय होणार नाहीत. ही वस्तुस्थिती विचारात घेऊन सर्व प्रभागांना सर्वसाधारण महिलांचे आरक्षण उपलब्ध होण्यासाठी सोडत काढण्याच्या प्रक्रियेमध्ये बदल करणे आवश्यक आहे.

आयोगाने प्रभाग रचना व आरक्षण निश्चितीकरिता सुधारित आदेश काढले आहेत. त्यानुसार प्रारुप प्रभाग रचनेचा संपूर्ण प्रस्ताव तयार करुन 6 जानेवारी 2022 रोजी आयोगाला निवडणूक विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी व्यक्तिश: उपस्थित राहून मान्यतेसाठी सादर करावा असे आदेश महापालिकेला दिले आहेत.

114 जागांवर खुल्या प्रवर्गातून निवडणूक?

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाच्या आरक्षणाला स्थगिती देताना या जागा खुल्या वर्गातून भरण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार निवडणुका घेण्याचे आदेश आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत 46 प्रभाग तर नगरसेवक संख्या 139 असणार आहे. 139 नगरसेवकांपैकी 69 पुरुष तर 70 महिला नगरसेविका अशी वर्गवारी असेल. 139 नगरसेवकांपैकी 3 जागा अनुसूचित जमाती (एसटी)साठी तर 22 जागा अनुसूचित जाती (एससी)साठी राखीव असतील. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक झाल्यास 139 मधील उर्वरीत 114 जागांवर खुल्या प्रवर्गातून निवडणूक होण्याची शक्यता आहे.

आयोगाच्या आदेशानुसार कारवाई

”राज्य निवडणूक आयोगाने सविस्तर माहितीसह प्रारुप रचनेचा आराखडा मागितला आहे. आयोगाच्या आदेशानुसार पुढील कारवाई करुन 6 जानेवारी 2022 रोजी आराखडा सादर केला जाईल” असे निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.