Maharashtra News : संत, समाज सुधारकांची भूमी असलेले महाराष्ट्र खरोखरच महान राज्य – राष्ट्रपती

एमपीसी न्यूज – समानता व भक्तीचा संदेश (Maharashtra News) देणारे ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ व तुकाराम यांसारखे संत, आत्मसन्मान व राष्ट्र गौरव वाढवणारे छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या समाज सुधारकांची भूमी असलेले महाराष्ट्र खरोखरच महान राज्य आहे. असे सांगून समाजाच्या शेवटच्या घटकासाठी कार्य करण्याची जाणीव राज्याकडून यापुढेही जपली जावी, अशी अपेक्षा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली.

राष्ट्रपतीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्रातील प्रथम आगमनानिमित्त द्रौपदी मुर्मू यांचा गुरुवारी (दि. 6) महाराष्ट्र शासनाच्या वतीने गुरुवारी राजभवन येथे नागरी सत्कार करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे व पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ गायिका महाराष्ट्र भूषण आशा भोसले, उद्योजक राजश्री बिर्ला आदी उपस्थित होते.

आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करताना राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांनी महाराष्ट्राचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील, आर्थिक व सामाजिक विकासातील तसेच संगीत व लोककला क्षेत्रातील योगदानाचे कौतुक केले. राष्ट्रपती श्रीमती मुर्मू म्हणाल्या की, राज्यात झालेल्या उत्साहपूर्ण स्वागताने आपण भारावून गेलो आहोत. हा प्रदेश विविधतेने नटलेला आहे. येथे सांस्कृतिक वारसा जतन करून ठेवला आहे.

नागपूर, पुणे, मुंबई येथे देशभरातील लोक वास्तव्यास येतात. त्यांचेही या देशाच्या विकासात योगदान आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून, देशाच्या आर्थिक विकासात या शहराचे मोठे योगदान आहे. साखर निर्यातीत जगात देशाचा दुसरा क्रमांक आहे. यात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे.

राज्याला समृद्ध इतिहास आहे. निसर्गरम्य पर्यटन स्थळे हे राज्याचे वैशिष्ट्य आहे. संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत तुकाराम, यांच्या विचाराने राज्यात समानता, स्नेह आणि भक्ती आहे आणि यामुळे (Maharashtra News) एकात्मिक भाव जपला जात आहे. आत्मसन्मान शिकविणाऱ्या शिवाजी महाराजांचा महान इतिहास या भूमीला लाभला आहे.

महिलांचे आणि मागासवर्गाचे शिक्षण आणि विकासासाठी फुले दाम्पत्य आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची प्रभावशाली परंपरा समतामूलक समाज निर्मितीसाठी महत्वपूर्ण ठरली आहे. तसेच, गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक यांच्यासारख्या महान समाजसुधारकांचाही इतिहास या राज्याला आहे. संगीत कला क्षेत्रातही या राज्यातील कलाकारांचे मोठे योगदान आहे. लोककला, लोकनृत्य, चित्रपट यामुळे राज्याची एक वेगळी ओळख निर्माण होते. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्याचे कार्य आपले शासन करीत आहे. यामुळे हे महान राष्ट्र आहे असे सांगून, राज्यातील जनतेच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी आशीर्वाद दिले.

स्वातंत्र्याच्या अमृत काळात द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती लाभणे भाग्य – राज्यपाल रमेश बैस

द्रौपदी मुर्मू यांचा झारखंड राज्याच्या राज्यपाल पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्या राज्याचा राज्यपाल म्हणून काम करण्याचे भाग्य आपणास लाभले असल्याचे राज्यपाल रमेश बैस म्हणाले. द्रौपदी मुर्मू राज्यपालांच्या परिषदेत करीत असलेल्या सूचना राष्ट्रपतींसह सर्वांकडून गांभीर्याने घेतल्या जात अशी आठवण राज्यपालांनी यावेळी सांगितली.

देश स्वातंत्र्याचा अमृतकाळ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे 350 वे वर्ष साजरे करीत असताना द्रौपदी मुर्मू यांसारखे साधे व निरलस व्यक्तिमत्व राष्ट्रपती म्हणून लाभणे हे देशाचे भाग्य असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

आदिवासींच्या विकासासाठी शासन कार्यरत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांचा सत्कार केला. यावेळी ते म्हणाले की, राज्याच्या भेटीसाठी आल्यावर आपण प्रथम नक्षलप्रभावीत अशा गडचिरोली भागात भेट दिली. यामुळे स्थानिकांना आणि सुरक्षा रक्षकांना ऊर्जा मिळाली आहे. नक्षलवाद संपवणे आणि रोजगार प्राप्त करून देऊन आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी (Maharashtra News) शासन कार्यरत आहे, ही भावना त्यांच्या मनात निर्माण होण्यास यामुळे मदत होणार आहे.

शासन आदिवासी विकासासाठी अनेक योजना राबवित असून आदर्श आश्रमशाळा निर्मितीसाठी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. आपण शून्यातून विश्व निर्माण केले असून शिक्षक ते राष्ट्रपती पदापर्यंतचा आपला प्रवास प्रेरणादायी आहे. सर्वसाधारण लोकांच्या प्रगती आणि विकासासाठी केंद्र शासनाच्यामदतीने लोकाभिमुख निर्णय घेण्यास प्राधान्य देत आहोत असेही मुख्यमंत्री म्हणाले.

राष्ट्रपती मुर्मू यांचे व्यक्त‍िमत्व प्रेरक आणि प्रेरणादायी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

द्रौपदी मुर्मू या स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती असून अनेक विक्रम त्यांच्या नावावर आहेत. त्यांचे व्यक्त‍िमत्व प्रेरक आणि प्रेरणादायी आहे. वंचित आदिवासी तसेच आदिम जनजातींप्रती त्या संवेदनशील आहेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, द्रौपदी मुर्मू यांचे जीवन अतिशय संघर्षमय होते. मुर्मू यांनी कठीण परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले परंतु त्यानंतर जास्तीत जास्त लोकांना शिक्षण घेण्यासाठी प्रेरित केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आदिवासी कुटुंबात व एका लहानशा गावात जन्मलेली मुलगी जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाची अध्यक्ष होणे हा लोकशाहीचा गौरव असल्याचे त्यांनी सांगितले.

NCP : 2024 मध्ये महाराष्ट्रात सरकार बदलेल यावर माझा पूर्ण विश्वास – शरद पवार

सुरुवातीला राज्यपालांनी राष्ट्रपतींचा शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. त्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी राष्ट्रपतींना गणेशाची व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट दिली. महाराष्ट्राची लोकसंस्कृती दर्शविणाऱ्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमानंतर राज्यपालांनी राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ स्नेहभोज आयोजित केले. स्नेहभोजनाला राज्य मंत्रिमंडळातील अनेक सदस्य उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.