Manobodh by Priya Shende Part 14 : मनोबोध भाग 14 – जीवे कर्मयोगी जनी जन्म झाला

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक चाैदा.

जीवे कर्मयोगी जनी जन्म झाला

परी शेवटी काळ मुखी निमाला

महा थोर ते मृत्यू पंथेची गेले

किती येक ते जन्मले आणि मेले

प्रत्येक मनुष्याला आपल्या कर्मानुसार पूर्वसंचितानुसार जन्म मिळत असतो. मनुष्य जन्म मात्र फारच दुर्लभ. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार जीवात्मा हा चौर्‍यांशी लक्ष योनी तून फिरून मग मनुष्य जन्माला येतो. पशुयोनी पक्षी योनी, कीटक योनी, सर्प योनी, मनुष्य योनी इत्यादी.
पूर्वकर्म चांगलं असेल तर मनुष्य जन्म हा सुखी कुटुंबात होतो. कुकर्म केलं असेल तर नीच योनीत जन्म होईल.

सगळं शेवटी तुमच्या कर्मानुसार आहे. जन्म कुठे घ्यायचा हे, सामान्य जीवाच्या हातात नाहीये. स्थळ-काळ-वेळ, कुळ हे काहीच हातात नाही. जर तो साधक असेल तर त्याला श्रीमंत, चांगल्या कुळात जन्म मिळतो.

जोपर्यंत हा जीव परमेश्वराशी एकरूप होत नाही, तोपर्यंत ह्या जीवाला सतत जन्ममृत्यूच्या फेर्‍यात अडकवला लागतं. जन्म- जीवन -मृत्यू म्हणजेच उत्पत्ती- स्थिती आणि लय, या लागोपाठ येणार्‍या घटना आहेत. मृत्यू हा अटळ आहे आणि जन्म झाल्यावर, मनुष्य त्याच्या जीवनात काय कर्म, साधना करतोय, त्यानुसार त्याचे संस्कार घेऊन, जीव पुढची वाटचाल करत असतो आणि मग दुसऱ्या देहात परत जन्म घेतो.
त्यामुळे जन्म घेतलेल्याला मृत्यू हा येणारच. नवीन देहात आल्यानंतर सत्कर्म करून परमेश्वराशी तादात्म्य साधलं तर, अशा जन्मतो जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होऊ शकतो. नाहीतर जन्म- जीवन- मृत्यू हे सतत चालू राहणार आहे.

सामान्य जीव तर या फेऱ्यात अडकत जातातच पण चांगलं जीवन जगणारी, देशासाठी कार्य केलेले आदर्श मंडळी,थोर लोक यांनाही मृत्यू अटळच आहे.
“परी शेवटी काळ मुखी निमाला” म्हणजे सगळेजण, काळ किंवा मृत्यूच्या तावडीत सापडणारच आहेत. कारण मृत्यू अटळ आहे. जे जे काही जन्माला आलंय त्याचा शेवट काळज करतो. तूच नष्ट करणार आहे. पसंत भगवत प्रियजन, हे इहलोकातील आपलं कार्य झालं की आपला देहत्याग करतात. तो अधिकार फक्त त्यांनाच आहे. ते कीर्तीने मागे उरतात. काहींची जनकल्याणासाठी पुन्हा नियुक्ती होते ती जबाबदारी भगवंतच त्यांच्यावर टाकतो किंवा स्वतः भगवंतच पुन्हा पुन्हा जन्म घेतात देह धारण करतात जगात दुष्कर्म पाप वाढलं कि त्याचा संहार करायला पुन्हा जन्म घ्यावा लागतो.

पुढे समर्थ म्हणतात की “महा थोर ते मृत्यू पंथेची गेले, किती येक ते जन्मले आणि मेले”.

अत्यंत थोर, बुद्धिमान, चांगलं कार्य करणारे जीव, महारथी पण मृत्युपंथाला गेले. चांगलं कर्म केलं तरी त्यांना मृत्यू हा होताच आणि असणारच तर सामान्य जीवाची काय कथा! असे सामान्य जीव तर कित्येक जण जन्मले आणि मेले. आपण तर फारच सामान्याहून सामान्य आहोत. महा थोर कर्म करणारे पण काळाने ओढून नेले. तर आपण त्यांच्यासमोर किडा-मुंगी प्रमाणे आहोत.

या जगामध्ये कोणाचं कोणा वाचून अडत नाही. कोणी कोणासाठी सदैव दुःख करत बसत नाही. त्यामुळे आलेला माणूस जाणार हे निश्चित आहे. जो जन्माला येतो तो इथे प्रपंचात रमून जातो त्याला हे जीवन आवडायला लागतं. जो आला तो रमला. पण प्रत्येकाने हे लक्षात ठेवले पाहिजे की, एक दिवस आपला मृत्यू अटळ आहे. हे जर सतत डोळ्यांसमोर राहिलं तर मग, आपोआपच आपल्या हातून सत्कर्म घडेल. हेच समर्थांना ह्या श्लोकात सांगायचं आहे. प्रत्येक जन्मात सत्कर्म करत करत पुढे जा आणि साधना करून, सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने, मुक्तीकडे जायचा प्रयत्न करा.

जय जय रघुवीर समर्थ

– प्रिया शेंडे
मोबाईल नं. 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.