Manobodh by Priya Shende Part 44 : मना रे जनी मौन्य मुद्रा धरावी

Manobodh by Priya Shende Part 44

एमपीसी न्यूज : – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 44 (Manobodh by Priya Shende Part 44)

मना रे जनी मौन्य मुद्रा धरावी

कथा आदरे राघवाची करावी

नसे राम ते धाम सोडोनी द्यावे

सुखा लागि आरण्य सेवित जावे

मागच्या श्लोकात समर्थांनी सांगितलं की, तुझं हित तुलाच बघायचं आहे. त्यासाठी कष्ट ही तुलाच करायचे आहेत आणि त्यागही तुलाच करायचा आहे.

या श्लोकात (Manobodh by Priya Shende Part 44) अजून एक अत्यंत उपयुक्त गोष्ट ते सांगत आहेत. ते म्हणत आहेत की “मना रे जनी माैन्य मुद्रा धरावी”.

म्हणजेच तू माैन मुद्रेत रहा. शांत रहा. माैन धर. कमीत कमी बोल. लोक खूप बोलतात. निरर्थक असतं ते. वायफळ बडबड करतात. जरा निरीक्षण करा, दिवस भर ऊर फुटेपर्यंत बोलतो आपण. त्यातलं खरंच काही महत्त्वाचं बोलतो का? किती बोलतो? निरर्थक प्रश्न विचारत असतो.

Pune News : वीज खरेदीसाठी पालिका एसपीव्ही स्थापन करण्यास स्थायी समितीची मंजुरी

आपल्याबद्दल बोलत असतो. मी किती दुःख सोसलं. किती वर्षाचं तेच तेच उगाळत असतो. मी किती काय कसं गाजवलं? काय काय पराक्रम केलेत. सतत आपली स्तुती लोकांना सांगत बसतो. दोन स्त्रिया जर एकत्र आल्या तर किती बोलतात? माहेरचं, सासरचं, संसाराचं, दागदागिन्यांचं, मुलाबाळांचं, कपड्यालत्तेचं, सासर कसं वाईट आहे, माहेरचं कौतुक. इतर तिथे उपस्थित नसलेल्या लोकांबद्दल गॉसिपिंग.. बापरे किती बोलतात? काय समाधान मिळतं? पुरुष भेटले की राजकारण, समाजकारण, अर्थकारण, करिअर, क्रिकेट.. किती बोलाल?

निरर्थक वाद विवाद, लोकांची स्तुती, स्वतःची स्तुती, शिव्याशाप. खूप निरर्थक बडबड, बढाया… त्यामुळे समर्थ सांगताहेत की बाबा रे, तू माैन धर. शांत रहा. खूप बोलणं हे मनातल्या खळबळीचं, अशांततेचं लक्षण आहे. तू मौन मुद्रेने म्हणजे, शांत मुद्रेने, तुझा लोकांमध्ये वावर ठेव. म्हणजे आपोआपच वादविवाद, भांडणे होणार नाहीत. सभोवताली पण शांती प्रस्थापित होईल.

मग बोलायचं तर काय बोलावं? समर्थ म्हणतात की, “कथा आदरे राघवाची करावी”. तुला बोलायचं तर तू ईश्वरा बद्दल बोल. परमेश्वराच्या लीला समजून घे. ग्रंथवाचन कर. कीर्तन भजन कर. नामस्मरण कर. याचा अर्थ असा की, तुझ्या चरितार्थासाठी जेवढं व्यवहारात बोलायचंय, तेवढं बोल. बाकी राघवा शिवाय काही बोलूच नकोस. खूप बोलून आपली शक्ती वाया घालवू नकोस. खूप बडबड करणाऱ्यांना कोणी जास्त सिरिअसली घेत नाही. पण मोजकं बोलणाऱ्यांचं बोलणं, लक्ष देऊन ऐकतात.

पुढे समर्थ म्हणतात की, “नसे राम ते धाम सोडोनी द्यावे”.

परमेश्वर खरंतर सगळीकडे आहे. तरीपण ज्या ठिकाणी त्याचा आदर होत नाही किंवा तिथली माणसं अहंकाराने फुललेली आहेत, ज्या घरात मनापासून रामाचं नाव घेतलं जात नाही, म्हणजे रामाची महती ओळखली जात नाही, त्याचा आदर नाही, नामस्मरण नाही, अशा घरात किंवा अशा कोणत्याही ठिकाणी तू थांबू नकोस. किंवा आपण असेही म्हणू शकतो की, जिथे रामाचं नाव घेतलं जात नाही, तिथे तू तसं वळण लाव. तू त्याचा महिमा सांग. ईश्वराची माहिती सांग. आणि त्यांना सन्मार्ग दाखव. आणि त्या वास्तूतही तू रामनामाचा वास आणण्याचा प्रयत्न कर.

शेवटी ते सांगताहेत की, “सुखा लागी आरण्य सेवित जावे”. अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगताहेत की, तुला खरंच सुख पाहिजे असेल तर, अरण्यात जा. म्हणजे मोहमायेच्या कोलाहलातून बाहेर पडून, तू एकांताचा स्वीकार कर. तू एकांतात रहा.

ध्यानाला बसलो तरी, सतत अगणित विचारांची चक्र फिरत असतात. मागं काय घडलं होतं, तसं का झालं? मलाच का त्रास सगळा? पुढे काय वाईट घडलं तर? असाध्य रोग झाला तर? जगबुडी झाली तर? अशा असंख्य गोष्टी मनात येत असतात, ज्याने चित्त स्थिर होत नाही. स्वतःचा विचार तुम्हाला ध्यानही करू देणार नाही. त्यामुळे निर्विचार होऊन एकांत साधला तर, त्या खऱ्या सुखाची प्रचिती येईल. त्यासाठी बाहेरच्या आणि आतल्या कोलाहलातून एकांतात जा. जिथे तुला खरी शांती मिळेल. सुखाची प्राप्ती होईल. जी अवर्णनीय आहे. ते सुख चिरंतन, शाश्वत आहे. त्याची अनुभूती घे.

जय जय रघुवीर समर्थ

प्रिया शेंडे
मोबाईल नं. 7020496590

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share