Manobodh by Priya Shende Part 46 : मना रे घडी राघवेवीण गेली

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 46 (Manobodh by Priya Shende Part 46)

मना रे घडी राघवेवीण गेली

जनी आपुले ते तुवा हानी केली

रघुनायकावीण तो शीण आहे

जनी दक्ष तो लक्ष लावूनी पाहे

आत्तापर्यंतच्या श्लोकात भगवंताची कर्तव्य, त्याचा कृपाळूपणा, त्याच्या लीला, त्याचे पराक्रम, त्याचे आदर्श या सगळ्यांचं वर्णन समर्थांनी केलंय. तसंच त्याला प्राप्तं करण्यासाठी मनाला, माणसांना उपदेश केलेला आपण ऐकलं. त्यात भक्ती करा. अनन्यभावाने शरण जा. मौन धारण करा. चांगल्या संगतीत राहा आणि अजून बरंच काही.

आता ह्या श्लोकात समर्थ माणसाला दक्ष राहायला सांगताहेत. माणसाने कायम दक्ष म्हणजे सावध राहायला सांगितले आहे. सावध असणाऱ्या माणसाला सगळ्या गोष्टींचं भान असतं. एकाच वेळी ते बरेच काम करू शकतात. समर्थांनी आपल्याला असं अष्टावधानी व्हायला सांगितले आहे.

इथे आपल्याला दोन प्रकारची माणसे दिसून येतात. एक म्हणजे जे फक्त संसारात रमले आहेत, आणि दुसरे जे संसारही व्यवस्थित करतात, आणि परमार्थही करतात. त्यांना परमेश्वर भक्तीची आस आहे. तळमळ आहे. एखादा क्वचितच प्रगती करतो. आपल्या संसारासाठी कर्म हे भगवंतांनी दिलेलं काम आहे, असं समजून करतो आणि ते कर्म करताना परमेश्वराचे नामस्मरण करतो, असा माणूस हा देवाचा लाडका भक्त असतो.जे काही काम आपण करत असून त्याला भगवंताच्या नावाची जोड असायला पाहिजे.

म्हणून समर्थ आपल्याला पहिल्या चरणात सांगत आहेत की, प्रत्येक क्षण हा भगवंताचे नामस्मरण न करता, फक्त संसारात रमण्यात गेला तर, जनी आपुले ते तुवा हानी केली, म्हणजे नुकसान हे तुझाच झालं आहे. म्हणजेच आजच्या घडीला तू भगवंताचे नाव घेतलं नाहीस, नामस्मरण केलं नाहीस, मी देही पणामुळे भगवंताला विसरलास, त्या त्या वेळी तू स्वतःचे नुकसान करून घेतला आहे. त्यात देवाचा किंवा बाकीच्या कोणाचा काहीच नुकसान नाही. या परमेश्वराला विसरून तुझा उद्धार होईल कसा? आधीच आपल्याला किती वेळ असतो? त्यातही तू जर नामस्मरण न करता, वेळ व्यर्थ दवडलास तर, नुकसान फक्त तुझाच होणार आहे. म्हणून समर्थ मनाला उपदेश करत आहेत की, जरा सुद्धा वेळ वाया न दवडता तू भगवंताच्या नामस्मरणात चिंतनात घालव. तरच तुझा उद्धार होईल आणि तुला मुक्तीचा मार्ग सापडेल. म्हणूनच राघवाशिवाय वेळ व्यर्थ घालवू नकोस. नाहीतर निरर्थक दमून जाऊन, तुझ्या वाट्याला फक्त शीणच येईल असं समर्थ सांगत आहेत.

रघुनायकावीण तो शीण आहे. जे काही तू त्याला विसरून करशील, त्यायोगे तुझी फक्त दमणूक होईल, आणि फक्त तुझा शीण वाढेल. काहीही लाभ न होता उलट हानी होईल, हे समर्थ आपल्याला समजावून सांगत आहेत.

थोडक्यात काय तर, जे काम कराल ते, भगवंताचं आहे, असं समजून करा आणि त्या सोबत वेळेचेही भान ठेवत, राम नाम जपत रहा. सतत भगवंताच्या चिंतनात रहा. यातूनच तो प्रभू मुक्तीच्या मार्गाला नेईल.

जय जय रघुवीर समर्थ

प्रिया शेंडे
मोबाईल नं. 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.