Maval News: शेतक-यांनी शेती बरोबरच शेतीपुरक व्यवसाय करून प्रगतशील व्हावे – बाबुराव वायकर

एमपीसी​ न्यूज ​– शेतकऱ्यांनी शेती बरोबर शेतीपूरक व्यवसाय करून आपली प्रगती करावी. असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबुराव वायकर यांनी केले.

मावळ तालुका पोल्ट्री व्यावसायिक संघटनेच्या उद्घाटनप्रसंगी वायकर बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी सहकार महर्षी माऊली दाभाडे होते. तर पुणे जिल्हा परिषदेचे पशु व वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे, डॉ. दीपक राक्षे उपस्थित होते.

मावळ तालुक्यामध्ये पहिला पोल्ट्री व्यवसाय करणारे अनिल बधाले, तालुक्यातील सर्वात मोठे पोल्ट्री व्यावसायिक संग्राम काकडे, तसेच उत्कृष्ट पोल्ट्री व्यवसाय करणारे सचिन पवार यांचा संघटनेकडून मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती वायकर म्हणाले की, शेतकऱ्यांनी फक्त शेती उत्पादनावर अवलंबून न राहता कायम आपल्या घरातील सदस्यांना रोजगार मिळेल असे दूध व्यवसाय, फुल शेती, कुक्कुटपालन असे व्यवसाय करावेत. तसेच या सर्व व्यवसायांना जिल्हा परिषदेचे मार्गदर्शन व आर्थिक सहकार्य मिळेल.

संघटितपणे आणि प्रामाणिकपणे शेतीपूरक व्यवसाय केल्यास त्या परिवारास निश्चितच आर्थिक मदत प्राप्त होते, असे माऊली दाभाडे यांनी सांगितले. तर आपण करत असलेल्या व्यवसायाचे नियोजन परिपूर्ण केल्यास व्यवसायात हमखास यश मिळेल असे उद्योजक संग्राम काकडे यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन सोनबा गोपाळे गुरुजी यांनी केले. तर आभार उद्योजक संदीप मालपोटे यांनी मानले. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार समर्पित करून अभिवादन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.