Maval News : पुणे महानगर नियोजन समिती निवडणूक; ग्रामीण, लहान नागरी मतदारसंघात 100 टक्के मतदान

एमपीसी न्यूज – पुणे महानगर नियोजन समिती निवडणूक 2021 च्या मावळ ग्रामीण मतदार संघ व लहान नागरी मतदार संघात (नगरपरिषद) 100 टक्के मतदान झाले. मावळ पंचायत समितीच्या सभागृहात बुधवारी (दि. 10) मतदान पार पडले. याची मतमोजणी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि. 12) सकाळी आठ वाजता होणार असल्याची माहिती केंद्राध्यक्ष मावळ तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली.

मावळ ग्रामीण मतदार संघात एक जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात होते. राष्ट्रवादीच्या वतीने दीपाली हुलावळे तर भाजपच्या वतीने कुलदीप बोडके यांना उमेदवारी मिळाली होती. मावळ लहान नागरी मतदार संघात (नगरपरिषद) राष्ट्रवादीच्या वतीने संतोष भेगडे व भाजपच्या वतीने अरुण भेगडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

बुधवारी सकाळी नऊ वाजता मतदानाला सुरुवात झाली. दुपारी अडीच वाजता संपूर्ण शंभर टक्के मतदान झाले. ग्रामीण मतदारसंघात मावळ तालुक्यातील 102 ग्रामपंचायतीचे 102 मतदार तर लहान नागरी मतदारसंघात (नगरपरिषद) लोणावळा व तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील 53 मतदार होते.

केंद्राध्यक्ष मधुसूदन बर्गे, मतदान अधिकारी क्रमांक एक नायब तहसीलदार रावसाहेब चाटे, नायब तहसीलदार संतोष सोनवणे, मतदान अधिकारी मंडलाधिकारी बजरंग मेकाले, मंडलाधिकारी सुरेश जगताप, कर्मचारी संदीप माळोदे, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी, मावळचे आमदार सुनील शेळके व त्यांचे समर्थक तसेच भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे व त्यांचे समर्थक उपस्थित होते.

मतदान शांततेत पार पडले. पोलिसांनी मतदान केंद्राच्या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मतदान प्रक्रियेनंतर मतपेट्या सील करुन पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना करण्यात आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.