Talegaon Dabhade : मावळ तालुका म्हणजे नजीकच्या काळातील विद्येचे माहेरघर – कृष्णराव भेगडे

रामदास (आप्पा) काकडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळयात भेगडे यांचे गौरोवोद्गार

एमपीसी न्यूज – तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये 44 विद्यार्थी संख्येवर सुरू झालेले इंद्रायणी महाविद्यालय आज कात टाकत पुढे जात आहे आणि याचे सारे श्रेय काकडे यांना जाते. काकडे यांच्या नेतृत्वाखाली आगामी काही वर्षांत तळेगावातील शैक्षणिक वातावरण बदललेले असेल आणि भविष्यात ते विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाईल, असे गौरवोद्गार मावळभूषण माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी काढले.

इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांच्या 58 व्या जन्मदिनाच्या निमित्ताने आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात भेगडे बोलत होते. या कार्यक्रमाला इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे उपाध्यक्ष गोरक्षनाथ काळोखे, कार्यवाहक चंद्रकांत शेटे, खजिनदार शैलेश शहा, सदस्य गणेश खांडगे, विलास काळोखे,निरूपा कानिटकर, सुनंदा काकडे, तसेच महाविद्यालय विकास समितीचे गणेश भेगडे, संदीप काकडे, युवराज काकडे, नूतन महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे, नंदकुमार शेलार, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संभाजी मलघे, डी फार्मसीचे प्राचार्य जी एस शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

यंदाचे वर्ष देशाचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. स्वातंत्र्यापासून आजपर्यंत प्रत्येक क्षेत्रांत अमूलाग्र बदल झाले. तळेगावही आज बदलत आहे.या सर्व बदलांमध्ये शैक्षणिक क्षेत्रातील बदल महत्त्वाचे असून रामदास काकडे यांनी आपल्या दूरदृष्टीने हे कालसुसंगत बदल स्वीकारले आणि त्यामुळे इंद्रायणी विद्या मंदिर संस्था गरुडझेप घेऊ शकली

रामदास आप्पा काकडे हे मावळातील धीरूभाई अंबानी असतील तर शैलेश शहा हे अदानी आहेत म्हणून ही जोडगोळी शिक्षणसंस्था पुढे नेण्यात मोठी भूमिका पार पडतील अशी टिप्पणी भेगडे यांनी करताच सभागृहात एकच हशा पिकला.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे कार्यवाहक चंद्रकांतजी शेटे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी रामदास काकडे यांचे नेतृत्व सक्षम असल्याचे सांगितले. संघर्षातून सिद्ध झालेले एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांचे व्यक्तिमत्त्व हे तरुणांसाठी आदर्श आहे असे शेटे म्हणाले. आप्पा कामात कितीही व्यग्र असले तरीही सेवाव्रती म्हणून निरपेक्ष भावनेने ते संस्थेसाठी वेळ देतात आणि काम करतात त्यामुळे संस्था वेगाने पुढे जात असल्याचे चंद्रकांत शेटे यांनी सांगितले.

संस्थेची नवी सात मजली इमारत उभी राहणार असून या नव्या इमारतीच्या कामासाठी अध्यक्ष काकडे यांनी त्यांच्या आईंच्या स्मरणार्थ दोन कोटी रुपयांची देणगी जाहीर केल्याबद्दल चंद्रकांत शेटे यांनी सर्व पदाधिकारी, प्राध्यापक आणि जनतेच्या वतीने काकडे यांचे आभार मानले.यावेळी काकडे यांच्या नेतृत्वाखाली इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या विकासकामांचा आढावा शेटे यांनी मांडला.

इंद्रायणी विद्यामंदिर परिवाराच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या वतीने प्राचार्य डॉ.संभाजी मलघे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. एका सामान्य कुटुंबातील मुलाचा आदिवासी शाळेतील प्रवास ते एक यशस्वी उद्योजक म्हणून रामदासजी काकडे यांचा समग्र जीवनप्रवासाचा दीर्घ पट डॉ.मलघे यांनी आपल्या भाषणातून उभा केला.

यावेळी सर्व उपस्थित भावनिक झाले. संस्थेचे खजिनदार शैलेश शहा आणि सदस्य निरूपा कानिटकर यांनी आप्पांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण त्यांच्या संघर्षातून काही बोध घेऊ शकलो तर तीच त्यांना मोठी भेट ठरेल अशा भावना व्यक्त केल्या. बी फार्मसीचे प्राचार्य विठ्ठल चोपडे यांनी आभार मानले.

“वाढदिवस म्हणजे राहिलेली कामं पुढील काळात पूर्ण करण्यासाठीचा संकल्प” – रामदास काकडे यांचे पुरस्काराला उत्तर देताना कृतज्ञ भाव

सत्कार सोहळ्याला उत्तर देताना रामदास काकडे यांनी कृतज्ञ भावनेने आपल्या जीवन प्रवासात ज्या ज्या लोकांनी सोबत काम केले किंवा अनेक सुहृद आणि ज्येष्ठांच्या आशीर्वादाने आपण इथपर्यंत पोहोचले असल्याचे सांगितले.या जीवन प्रवासात पत्नी सुनंदा काकडे या खांदयाला खांदा लावून माझ्या सोबत उभ्या राहिल्या. त्यांच्या भक्कम साथीमुळे हे सर्व शक्य झाल्याचे काकडे म्हणाले. ‘वाढदिवस म्हणजे राहिलेली काम पुढील काळात पूर्ण करण्यासाठीचा संकल्प असतो म्हणून साठीच्या जवळपास जरी पोहोचलो असलो तरी साठी बुद्धी नाठी असे मी मानत नाही तर साठी बुद्धी मोठी’ असे म्हणून सकारात्मक पद्धतीने काम करत पुढे जाणे महत्त्वाचे असल्याचे मत रामदासजी काकडे यांनी व्यक्त केले.

गुरे चरायला नेऊन उरलेला वेळ इंद्रायणी महाविद्यालयात शिकलो. आपल्या पूर्वसूरींनी ही संस्था मोठी करताना खूप त्याग केला आहे आणि त्या व्यक्ती आपल्या आदर्श असतील तर आपण कधीही न थकता काम करू शकतो असे त्यांनी सांगितले. आपल्याला आयुष्यात जे जे काही चांगले मिळाले ते सगळे आपणा सर्व उपस्थितांना मिळो अशा स्वरूपाच्या कृतज्ञ भावना त्यांना यावेळी व्यक्त केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.