Pimpri News : भोसरी, आकुर्डीतील वीजग्राहकांना मोठा दिलासा; पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा झाला सुरळीत

महापारेषणकडून नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे काम सुरु

एमपीसी न्यूज – महापारेषण कंपनीच्या भोसरी येथील अतिउच्चदाब 220 केव्ही उपकेंद्रातील 100 एमव्हीए क्षमतेचा पॉवर ट्रान्सफॉर्मर बुधवारी (दि. 23) सकाळी 6 वाजता पुर्णतः नादुरुस्त झाल्यामुळे भोसरी व आकुर्डी परिसरातील महावितरणच्या सुमारे 60 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला होता. मात्र विविध ठिकाणच्या उपकेंद्रांतून सुमारे 50 मेगावॅट विजेचे भारव्यवस्थापन करून महावितरणकडून दुपारी 2 वाजेपर्यंत सर्वच ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

दरम्यान, महापारेषणकडून नादुरुस्त पॉवर ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे काम सुरु करण्यात आले असून येत्या शनिवार (दि. 26) पर्यंत ते पूर्णत्वास जाईल. तोपर्यंत भोसरी व आकुर्डी परिसरात पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने घरगुती, वाणिज्यिक व पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा 24 तास सुरु ठेवण्यात येणार आहे तर विजेच्या वाढत्या मागणीमुळे नाईलाजाने भोसरी एमआयडीसीमधील सुमारे 7500 औद्योगिक ग्राहकांना चक्राकार पद्धतीने 12 तास वीजपुरवठा करण्यात येत आहे.

भोसरीमधील महापारेषण कंपनीच्या अतिउच्चदाब 220 केव्ही उपकेंद्रामध्ये 100 एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये बुधवारी सकाळी 6 वाजता बिघाड झाला. त्यामुळे या ट्रान्सफॉर्मरवरील 10 वीजवाहिन्यांची वीज खंडित झाली व भोसरी एमआयडीसी एस ब्लॉक, टी ब्लॉक, भोसरी एमआयडीसी परिसर तसेच नेहरूनगर, यशवंतनगर, शांतीनगर, भोसरी गावठाण, इंद्रायणीनगर, चक्रपाणी वसाहत, शास्त्री चौक, भोसरी परिसर व आकुर्डी परिसर आदी भागातील 4500 औद्योगिक ग्राहकांसह सुमारे 60 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला.

दुपारी 12 वाजता ट्रान्सफॉर्मर पूर्णतः नादुरुस्त झाल्याचे आढळून आल्याने महापारेषणकडून तो बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. हे काम येत्या शनिवारपर्यंत पूर्णत्वास जाईल. तोपर्यंत प्रामुख्याने घरगुती, वाणिज्यिक ग्राहकांना पर्यायी व्यवस्थेतून 24 तास वीजपुरवठा करण्याचे नियोजन महावितरणचे मुख्य अभियंता सचिन तालेवार, अधीक्षक अभियंता सतीश राजदीप, कार्यकारी अभियंता उदय भोसले यांनी प्रत्यक्ष उपकेंद्राला भेट देऊन तयार केले.

त्याप्रमाणे महापारेषणच्या उपकेंद्रामधील दुसऱ्या 75 एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरवरून सुमारे 26 वीजवाहिन्यांना वीजपुरवठा करण्याचे आव्हान होते. त्यावर यशस्वी उपाययोजनांनी मात करीत दुपारी 2.30 वाजेपर्यंत पर्यायी व्यवस्थेतून भोसरी व आकुर्डी परिसरातील वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्यात आला. यामध्ये 75 एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरवरील 11 वीजवाहिन्यांचा भार अन्य उपकेंद्रांवर वळविण्यात आला.

त्यामुळे ट्रान्सफॉर्मरवरील वीजभार कमी झाला. तर उर्वरित 15 वीजवाहिन्यांपैकी प्रामुख्याने घरगुती व वाणिज्यिक व इतर वीजग्राहक तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या एक्सप्रेस वीजवाहिनीसह एकूण 8 वीजवाहिन्यांना 24 तास वीजपुरवठा करण्यासाठी तांत्रिक उपाययोजना करण्यात आली. याच ट्रान्सफॉर्मरवरून औद्योगिक ग्राहकांच्या 7 पैकी 4 वीजवाहिन्यांवरील वीजपुरवठा देखील सुरळीत झाला.

मात्र भारव्यवस्थापन शक्य नसल्याने उरलेल्या तीन वीजवाहिन्यांवरील भोसरी एमआयडीसीमधील सुमारे 7500 औद्योगिक ग्राहकांना नाईलाजाने चक्राकार पद्धतीने 12 तास वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा लागत आहे. याबाबत संबंधित औद्योगिक ग्राहक व संघटना पदाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. महापारेषणकडून नादुरुस्त पॉवर ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे काम पूर्ण होताच या औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.