Maval : तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाची निविदा प्रसिद्ध; कामाला लवकरच होणार सुरुवात

एमपीसी न्यूज – तळेगाव-चाकण-शिक्रापूर 548 डी राष्ट्रीय महामार्ग, पुणे ते शिरूर आणि नाशिक फाटा ते खेड या (Maval) तीन उन्नत मार्गाच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे या मार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.

तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते. अशीच परिस्थिती देहूरोड सेंट्रल चौक ते चांदणी चौक दरम्यान देखील असते. या मार्गांवरील कोंडी कमी करण्यासाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे. त्यांच्या पाठपुराव्याला यश येत असून तळेगाव-चाकण-शिक्रापूर, पुणे ते शिरूर आणि नाशिक फाटा ते खेड या मार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.

संसदेच्या अधिवेशनात केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले होते की, पुणे-मुंबई मार्गासह तळेगाव-चाकण-शिक्रापूर या मार्गांवर मोठ्या प्रमाणात रस्ते वाहतूक होते. या भागात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहती आहेत. या भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी केंद्र सरकार काम करत आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर या दरम्यान उड्डाणपुल बांधला जाणार आहे. त्याचे डिझाईन बनवण्यात आले असून त्याचा डीपीआर देखील तयार झाला आहे. तो डीपीआर दिल्ली येथे मंजुरीसाठी आला आहे. त्याला लवकरच मंजुरी दिली जाईल.

Pimpri : रयत विद्यार्थी विचार मंचच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

पुणे-अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर या मार्गावर नवीन द्रुतगती मार्ग बनवला जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने बनवलेल्या कार्पोरेशनला बीओटी तत्वावर या रस्त्याचे काम देण्याबाबत विचार सुरु आहे. याच दरम्यान तळेगाव-चाकण-शिक्रापूर दरम्यानचा देखील उन्नत (Maval) मार्ग बनवला जाणार आहे. त्याला लवकरच मंजुरी दिली जाईल.

तळेगाव-चाकण-शिक्रापूर हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग 548 डी म्हणून पाच वर्षांपूर्वी घोषित करण्यात आला. त्यानंतर या कामासाठी कोट्यावधी रुपयांची घोषणा करण्यात आली. मात्र प्रत्यक्ष कामाबाबत हालचाली झाल्या नाहीत. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने त्रयस्थ सल्लागार संस्थेमार्फत महामार्गाचे सर्वेक्षण करून विस्तृत प्रकल्प अहवाल मंजुरीसाठी सादर केला होता.

तळेगाव ते चाकण या टप्प्यातील 25 किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे बांधा वापरा हस्तांतरित करा बीओटी तत्त्वावर चौपदरीकरण करण्यात येणार आहे. या रस्त्यावर चौपदरी उड्डाणपूल बांधण्यासाठी 2455 कोटी 78 लाख रुपयांची निविदा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने प्रसिद्ध केली आहे. चाकण ते शिक्रापूर या टप्प्यातील 28 किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे चौपदरीकरण करून त्यावर चौपदरी उड्डाणपूल बांधण्याच्या कामासाठी 2778 कोटी 53 लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. या महामार्गाच्या प्रत्यक्ष कामाला पुढील काही दिवसात सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.