Pimpri News : ‘स्टार्ट अप’च्या माध्यमातून महिला उद्योजकांमध्ये भर पडतेय – महापौर ढोरे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेद्वारे अनेक महत्त्वकांक्षी योजना शहरातील महिलांसाठी राबविल्या जात आहे. महापालिकेच्या योजनांचा फायदा घेत अनेक महिला वर्ग नवउद्योजक म्हणून पुढे येत असल्याचा आनंद असून स्टार्टअपच्या माध्यमातून महिला उद्योजकांमध्ये भर पडत असल्याचे मत महापौर उषा ढोरे यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड महापालिका अंतर्गत स्मार्ट सिटीच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवड स्टार्ट-अप आणि इनक्युबेशन सेंटरच्या वतीने दुस-या वर्धापन दिनानिमीत्त “पीसीएसआयसी स्टार्ट-अप कॉन्क्लेव्ह – 2021” या एक दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी अध्यक्षीय भाषणात महापौर ढोरे बोलत होत्या. दरम्यान, ऑटो क्लस्टर परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रसंगी, हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेले तिन्ही संरक्षण दलाचे प्रमुख बिपीन रावत व शहीद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

याप्रसंगी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स व एग्रीकल्चरचे अध्यक्ष सुधीर मेहता, सिम्बॉयसीस युनिर्व्हसीटीच्या प्रो- कुलगुरु डॉ. स्वाती मुजूमदार, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, नगरसेवक सचिन चिखले, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, ऑटो क्लस्टरचे मॅनेजिंग डायरेक्टर किरण वैद्य, मॅनेजर उदय देव आदी उपस्थ‍ित होते.

पाठबळ मिळाले की तरुणांच्या स्वप्नांना भरारी

आयुक्त राजेश पाटील म्हणाले की, आज नवीन रोजगार निर्माण करणा-या तरुणांची गरज आहे. पाठबळ मिळाले की तरुणांच्या स्वप्नांना भरारी मिळते. तरुणांमध्ये स्टार्टअपची क्रेझ वाढली आहे. त्यांच्यात फॅशन निर्माण झाली आहे. नवउद्योजकांना उभारी देण्यासाठी तरुणांची कमतरता लक्षात घेऊन दोन वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून स्टार्ट-अप आणि इनक्युबेशन सेंटरद्वारे एक व्यासपीठ उभारुन दिलेले आहे. याचा फायदा अनेक तरुण घेत असून 50 स्टार्टअपची जबाबदारी स्व‍िकारली आहे. आज स्टार्ट-अप कॉन्क्लेव्ह कार्यक्रमासाठी 127 नवस्टार्टअपची नोंदणी झाली आहे.

नवउद्योजक आणि स्टार्ट अप्स यांना चालना देण्यासाठी इनक्युबेशन सेंटर

पिंपरी चिंचवड महापालिका, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि. आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने 14 नोव्हेंबर 2019 रोजी नवउद्योजक आणि स्टार्ट अप्स यांना चालना देण्यासाठी इनक्युबेशन सेंटरची स्थापना करण्यात आली. ऑटोमोटीव्ह इंजिनिअरींग, बायो फार्मा, माहिती तंत्रज्ञान, सेवा क्षेत्र या क्षेत्रांमध्ये नवनिर्मिती, सहयोग आणि उद्योजकता यांना प्रोत्साहन देणे हे उददीष्टये ठेवून सेंटर कार्यरत आहे.

नवउद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत असून 12 मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली स्टार्टअप सक्रिय आहेत. इनक्यूबेट्स तसेच स्टार्टअप्समध्ये आवश्यक ज्ञानासह पिंपरी चिंचवड मनपा आणि पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात आतापर्यंत एकूण 13 सत्रे घेण्यात आलेली आहेत तसेच, PCSIC नव उद्योजकांसाठी 6 आठवड्यांचा कोर्स (विनामूल्य) कॅप्सूल कोर्स सुरू करण्यात आला असून यामध्ये एकूण 180+ पीसीएमसी स्टार्टअप्सनी सहभाग घेतला आहे. यात महिला नवउद्योजकांच्या संख्येत वाढ झाल्याचे पाहावयास मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

महिलांची उद्योग क्षेत्रात भरारी

डॉ. स्वाती मुजुमदार म्हणाल्या की, रोजगाराच्या मागे न धावता महिला देखील उद्योजकांच्या शर्यतीत उतरल्या आहेत. उद्योजक म्हणून महिलांची संख्या कमी असली तरी बाजार आणि विक्रीचे योग्य नियोजन करून त्या देखील उद्योग क्षेत्रात भरारी घेत आहेत. आजच्या घडीला बेरोजगार हातांना रोजगार देणा-या तरुण नवउद्योजकांची गरज असून ही कमतरता लक्षात घेवून तरुणांनी स्टार्टअपचे नियोजन करणे आवश्यक आहे. केंद्र व राज्य शासनाच्या वतीने तरुणांसाठी अनेक योजना राबविल्या जात असून महिलांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.