Meaning of National Pledge : अर्थ प्रतिज्ञेचा (भाग 4) – माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे

एमपीसी न्यूज (प्रा. श्रीपाद भिडे) – पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पानावर प्रतिज्ञा छापलेली असते. ती नुसतीच तोंडपाठ असते, नाही का? जरी ही प्रतिज्ञा आपल्या अभ्यासक्रमाचा भाग नसला तरी एक भारतीय नागरिक म्हणून आपल्या प्रत्येकाकरिता ही प्रतिज्ञा भीष्मप्रतिज्ञा व्हायला हवी आणि म्हणूनच आपण या प्रतिज्ञेचा, प्रतिज्ञेच्या प्रत्येक ओळीचा अर्थ प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सुरू केलेल्या या विशेष लेखमालेतून समजावून घेणार आहोत.

मित्रांनो आजतागायत आपण  भारत माझा नव्हे  तर  माझाच देश कसा होईल. सारे भारतीय माझेच बांधव  आहेत, ही भावना सतत जागृत ठेवण्यासाठी काय करणे अपेक्षित आहे आणि माझ्या देशावर माझे प्रेम आहे  म्हणजे नक्की काय  ह्या गोष्टी तपासून पहिल्या. नुसती ही तीन वाक्ये अंगिकारली की प्रतिज्ञा  फळाला नक्कीच येणार नाही. तर इथल्या प्रत्येक गोष्टींवर आपले मनापासून प्रेम हवे.

आपल्या भारताची संस्कृती ही अतिप्राचीन असून आपला देश समृद्ध अशा विविध परंपरांनी नटलेला आहे.  माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.  इथे नुसतेच परंपरा असे न म्हणता समृद्ध परंपरा असे म्हटले आहे. समृद्ध म्हणजे संपन्न, धनवान ,सशक्त. एखादी गोष्ट संपन्न अथवा सशक्त  कशी होते जर त्याला कोणाचा तरी सबळ पाठिंबा असेल तर. मग आपल्या भारतीय परंपरांना सशक्त  कोणी बनवले तर आपल्या पूर्वजांच्या अनुभवांनी आणि विज्ञानाने.

जरी आपले पूर्वज, आजी आजोबा पूर्वी कोणतीही परंपरागत गोष्ट करण्यामागचे कारण सांगत नसले तरी आज विज्ञानाच्या कसोटीवर आपल्या सगळ्या परंपरा तंतोतंत उतरत आहेत. जन्माला आल्यापासून ते मृत्यू नंतर देहाची विल्हेवाट लागेपर्यंत आपल्याला बऱ्याच प्रश्नांना सामोरे जावे लागते. एवढेच नव्हे तर त्यातून त्या   परिस्थितीशी मिळताजुळता पर्याय शोधावा लागतो. आणि  प्रत्येक वेळी असे पर्याय शोधत बसणे हे शक्य नाही.

आणि हा पर्याय म्हणजे आपल्या पूर्वजांच्या अनुभवाने सिद्ध झालेला आणि एका पिढी कडून दुसऱ्या पिढीकडे  संक्रमित झालेला सांस्कृतिक मौलिक वारसा म्हणजे आपली परंपरा होय. आपल्या संस्कृती मध्ये अगणित परंपरा आहेत. गुरुशिष्य परंपरा तर सर्व ज्ञात आहेच. त्याचप्रमाणे आपली साहित्याची परंपरा  तर अमूल्य अशी आहे.

वेद, उपनिषदे, रामायण , महाभारत, भगवतगीता यासारखे साहित्य पाच ते दहा हजार वर्षांपूर्वीचे  असूनही  आजही जीवनाचे सार सांगणारे आहे. कालिदास, तुलसीदास, भास, भवभूती, ज्ञानेश्वर, तुकाराम ह्या संत माहात्म्यांचेही साहित्य अजोड असेच आहे. आपला देश ज्ञानविज्ञानाच्या क्षेत्रात कित्येक पटीने जगाच्या पुढे होता.

त्या काळात तक्षशिला, नालंदा, विजयनगर, सारनाथ अशी एक ना अनेक परंपरागत विश्वविद्यालये होती.  आपल्या आयुर्वेदाच्या परंपरेने साऱ्या जगाचे लक्ष केंद्रित केले आहे. अश्विनीकुमार, धन्वंतरि, चरक, च्यवन असे एक ना अनेक आयुर्वेदाचार्य आहेत. सुश्रुत यांनी तर इ. स. ६०० पूर्व मध्ये पहिल्यांदा प्लास्टिक सर्जरी केली. ऋषी मुनींच्या सिद्ध केलेल्या आपल्या परंपरागत योगसाधनेचेही महत्व आज साऱ्या जगाला पटल्याने २१ जून हा जागतिक योग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो ही त्या परंपरेच्या यशाचीच पावती आहे.

परदास्याच्या जोखडातून आपल्या मातृभूमीची मुक्तता करण्यासाठी अतुलनीय अशा पराक्रमाची ही परंपरा आपलीच. मातृभूमीच्या रक्षणार्थ  बलिदानालाच सर्वस्व मानणारी आणि सारे घरदार त्या यज्ञकुंडात झोकून देणारी ही परंपरा जगाच्या पाठीवरती कुठेही पाहायला मिळणार नाही.

भारतीय संगीताची परंपराही फार प्राचीन आहे. परंपरागत वेशभूषा तसेच निसर्गातील प्रत्येक लहानातल्या  लहान गोष्टीला मनोभावे पुजण्याची परंपराही इतर कोठेही आढळणार नाही. आपल्या सणावारातूनही निसर्गापोटी असणारी कृतज्ञता, आपुलकी, प्रेम, बंधुत्व व्यक्त होते.  नागपंचमी , बैलपोळा, पांडव पंचमी, पाडवा, भाऊबीज ही काही उदाहरणे.

महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय परंपरा म्हणजे पंढरीची वारी. वर्षानुवर्षे अविरत हि वारी करणारे वारकरी आपले तन मन धन विसरून जवळजवळ तीन चार महिने विठ्ठलाच्या नामस्मरणात तल्लीन होऊन जातात.  मुळ ‘वारी’ ह्या शव्दाचा अर्थच यात्रा, आणि नियमितपणे, एक व्रत म्हणून जो करतो तो ‘वारकरी’.  हीच आपली भक्तीची परंपरा.

आपली खानपान परंपरा हि अगदी विज्ञानाला धरून आहे. आपल्याला जरी घासफूस खाणारे भारतीय समजत असले तरी आपल्यासारखी अन्नाची चव  कुठेही अनुभवायला मिळणार नाही. आपले परंपरागत अन्न हे निसर्गचक्राप्रमाणेच आहे. हिवाळ्यात स्निग्ध -उष्णतावर्धक पदार्थ, पावसाळ्यात पचायला हलके पदार्थ  ही आपली परंपरा. चातुर्मासाचे चार महिने कांदा, लसुण, वांगे खाऊ नये का तर ते वातूळ आहे . पावसाळ्यात पचायला जड आहे हा शास्त्रीय आधार.

मित्रांनो अंगणात रांगोळी काढण्याची आपली एक जुनी परंपरा. ह्याची संभाव्य कारणे म्हणजे  पूर्वीची घरे जमिनीलगत असल्याने सरपटणारे  जीव सहजगत्या घरात शिरु शकत होते. दारासमोर रांगोळी घातली असल्याने, रांगोळीच्या खरखरीत कणांमुळे अश्या सरपटणार्या जीवजंतूना एक प्रकारचा अवरोध होत असे. तरीदेखील एखादा सरपटणारा जीव रांगोळी ओलांडून घरात शिरलाच तर विस्कटलेल्या रांगोळीमुळे असं काही घरात शिरले असावे हे पाहणाऱ्याला कळत असावे. शिवाय घरातल्या स्त्रीला तिचे कलागुण दाखवायला एक दालन मिळत असे. ज्यामुळे घराला सौंदर्य लाभत असे.

अशाच प्रकारे लहान मुलांचे कान टोचणे ही वैदिक परंपराही अगदी शास्त्राला धरूनच आहे. अशाही  बऱ्याच परंपरा व आधार सांगता येतील. आपल्या संस्कृतीमध्ये एकही क्षेत्र असे नाही कि तिला काही परंपरा नाही.

थोडक्यात  काय  तर आपला देश हा अतिशय समृद्ध अशा परंपरांनी नटलेला आहे. आपल्या देशात विविध  धर्माचे अनुयायी रहात आहेत. प्रत्येक धर्माच्या काही ना काही परंपरा असतातच. आपण ज्या धर्माचे पालन करतो आहोत त्या धर्माच्या परंपरांचा आपण आदरच केला पाहिजे. आणि बंधुत्व अबाधित राहण्यासाठी  इतर धर्म परंपरांमध्ये अडथळा ही बनता कामा नये. एक भारतीय नागरीक म्हणून आपले ते आद्य कर्तव्य आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.