Pune News : मनसे नगरसेवक वसंत मोरे यांची ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद, कोरोना काळात केलेल्या कार्याची दखल 

एमपीसी न्यूज – पुण्यातील मनसेचे विद्यमान नगरसेवक आणि शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची जागतिक आरोग्य संघटनेकडून दखल घेण्यात आली असून, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्यांच्या नावाची नोंद करण्यात आली आहे.

वसंत मोरे यांनी कोरोना संकटकाळात केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत जागतिक आरोग्य संघटनेने मोरे यांचा गौरव करत त्यांचा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये समावेश केला आहे. मोरे यांनी दिलेल्या कोरोना महामारीच्या काळात सामाजिक बांधिलकीच्या आणि समर्पित व प्रामाणिक भावनेतून मानवी सुरक्षिततेसाठी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन हा गौरव करण्यात आल्याचा जागतिक आरोग्य संघटनेनेच्या प्रशस्तिपत्रात नमूद केले आहे.

‘जेव्हा संकट येते तेव्हा येताना ते सोबत संधी ही घेऊन येते ती संधी मला कोरोनाने दिली. जसा कोरोनाचा ट्रेण्ड बदलत गेला तसा मी त्या विरोधात लढण्याच्या पद्धती मध्ये मी बदल केला, म्हणजे जेव्हा धान्य वाटायचे तेव्हा धान्य वाटले, जेव्हा हॉस्पिटलची बिले कमी करायची होती तेव्हा ती कमी केली, बेड मिळत नव्हते ते मिळवुन दिले, अँबुलन्स मिळाली नाही ती ही मिळवून दिली, स्मशान भूमीत जाळायला जागा मिळत नव्हती ती मिळवुन दिली, हॉस्पिटल मध्ये जागा मिळत नव्हती तर हॉस्पिटलच टाकले, रेमडीसीवरसाठी अधिकारीच ठोकला.’

‘ऑक्सिजनसाठी तर रात्रीचा दिवस केला, तिसरी लाट येणार येणार नुसते म्हणत होते तर आजून एका हॉस्पिटलची तयारी केली, लसीकरनासाठी 4 दवाखाने उपलब्ध करून दिले, हप्ते थकले म्हणून गाड्या ओढायला आले तर हातात दांडा घेऊन प्रतिकार केला कोरोनाने त्याचे अनेक रंग बदलले पण मी माझ्या जनतेची साथ नाही सोडली म्हणून आज वर्ल्ड बुक रेकॉर्ड लंडनने मला पुरस्कार दिला.’ अशी फेसबुक पोस्ट वसंत मोरे यांनी टाकली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.