Moshi : पादचारी गरोदर महिलेला कारची धडक; महिला गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी जात असलेल्या गरोदर महिलेला कारने धडक दिली. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली. ही घटना रविवारी (दि. 22) रात्री साडेसातच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर मोशी येथे घडली.

नीलम अमोल सैद (वय 32, रा. संतनगर, मोशी) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कारचालक सुधाकर विजयानंद पाटोळे (वय 40, रा. दिघी रोड, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी फिर्यादी नीलम यांच्या घरी त्यांच्या जाऊ सविता बाळासाहेब सैद आल्या होत्या. रात्री साडेसातच्या सुमारास त्या भोसरी येथील त्यांच्या घरी जाण्यासाठी निघाल्या. त्यांना रिक्षात बसवून देण्यासाठी फिर्यादी नीलम पुणे-नाशिक महामार्गावर गेल्या. सविता यांना रिक्षात बसवून नीलम घराकडे परतल्या. मात्र, त्याच चौकात सुधाकर याने त्याच्या एम एच 14 / एफ सी 53 98 या कारने नीलम यांना धडक दिली.

यामध्ये नीलम यांच्या कपाळावर, हाताला व पायाला गंभीर इजा झाली आहे. सुधाकर याने घटनेनंतर नीलम यांना त्याच्या कारमधून तात्काळ उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. फिर्यादी नीलम दोन महिन्यांच्या गरोदर आहेत. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.