MSRTC : इंधन दरवाढीचा फटका ST महामंडळालाही, 1,000 डिझेल गाड्यांचे CNG मध्ये रुपांतर होणार

एमपीसी न्यूज – कोरोना संकटामुळे घटलेली प्रवासी संख्या आणि इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीवर आर्थिक बोजा पडत आहे. महामंडळावरील आर्थिक बोजा कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने आपल्या ताफ्यातील 1,000 गाड्या सीएनजीमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली. या रिट्रोफिटमेंटसाठी राज्य सरकार एसटी महामंडळाला निधी देणार आहे.

परिवहनमंत्री परब म्हणाले, कोरोना संकटामुळे एसटीची प्रवासी संख्या कमी झाल्याने त्याचा उत्पन्नाला फटका बसला आहे. त्यातच डिझेलच्या दरातही दिवसेंदिवस वाढ होत आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात डिझेलवर धावणाऱ्या 17 हजार बसेस असून डिझेलवर होणारा खर्च हा एकूण खर्चाच्या 34 टक्के इतका होता. वाढत्या डिझेल किमतीमुळे तो आता 38 ते 40 टक्क्यांवर पोहोचला आहे. डिझेलवर होणाऱ्या कोट्यावधी रूपयांच्या खर्चाचा गांभीर्याने विचार करत डिझेलला पर्यायी इंधनाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

एसटीच्या ताफ्यात लवकरच सीएनजी बरोबरच इलेक्ट्रीक, एलएनजी अशा पर्यावरणपूरक इंधनावर धावणाऱ्या बसेस दाखल होणार आहेत. त्यामुळे भविष्यात इंधनावरील खर्चाच्या बचतीबरोबरच पर्यावरणपूरक प्रवासाला एसटी प्राधान्य देणार आहे. इंधनाचा खर्च कमी करण्यासाठी सीएनजीबरोबरच इतर पर्यायांचाही वापर करण्याचे निर्देश परब यांनी दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.