Mumbai: एसटीच्या मासिक, त्रैमासिक पास धारकांना दिलासा; पासला मिळणार मुदतवाढ

Mumbai: Consolation to ST's monthly, quarterly pass holders; The pass will get an extension ज्या प्रवाशांना आपला पास रद्द करून, उर्वरित रकमेचा परतावा हवा असेल, त्यांना देखील तो परतावा देण्याची सुविधा एसटी प्रशासनाने दिली आहे.

एमपीसी न्यूज- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या टाळेबंदीमध्ये एसटीची वाहतूक राज्यभर पूर्णत: थांबवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर ज्या प्रवाशांनी आपले मासिक, त्रैमासिक पास काढले असतील, परंतु त्यांना टाळेबंदीमुळे प्रवास करणे शक्य झाले नसेल, अशा प्रवाशांना त्यांच्या मासिक, त्रैमासिक पाससाठी मुदतवाढ देण्यात येत आहे. अशी माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी दिली.

अनिल परब म्हणाले, 22 मार्च 2020 पासून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी लागू करण्यात आली होती. 22 मार्चपूर्वी एसटीने प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी मासिक, त्रैमासिक पास काढले होते.

परंतु, एसटी बंद असल्याने त्यांना या काळात प्रवास करणे शक्य झाले नाही. अशा प्रवाशांच्या मासिक, त्रैमासिक पासला सध्या मुदतवाढ देण्यात येत आहे.

ज्या प्रवाशांना आपला पास रद्द करून, उर्वरित रकमेचा परतावा हवा असेल, त्यांना देखील तो परतावा देण्याची सुविधा एसटी प्रशासनाने दिली आहे.

त्यासाठी संबंधित प्रवाशांनी जवळच्या आगारात जाऊन आगारप्रमुखांच्या नावे विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

त्यानंतर त्यांना, त्यांच्या मासिक, त्रैमासिक पासला मुदतवाढ अथवा त्यांच्या पासचा उर्वरित परतावा रक्कम देण्याची व्यवस्था आगार पातळीवर करण्यात येईल, असेही परिवहनमंत्री परब यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.