Mumbai News: महान देशाचे महान पंतप्रधान म्हणून राजीव गांधी सदैव स्मरणात राहतील- अजित पवार

Mumbai: Rajiv Gandhi will always be remembered as the great Prime Minister of a great country - Ajit Pawar युवकांना अठराव्या वर्षी मतदानाचा हक्क दिला. देशाला आधुनिक विचार, जागतिक व्यासपीठांवर सन्मान मिळवून देण्याचं काम केलं.

एमपीसी न्यूज – युवा नेते, माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांनी देशाची एकता, अखंडता, सार्वभौमतेसाठी सर्वोच्च त्याग केला. एकविसाव्या शतकाची आव्हाने पेलण्यासाठी देशाला सज्ज केले. संगणक क्रांती, डिजिटल क्रांती विचारपूर्वक घडवून आणली. ग्रामीण भागात दूरध्वनीसेवा पोहोचवली. पंचायतराज व्यवस्था भक्कम केली. नवोदय विद्यालयांची पायाभरणी केली. युवकांना अठराव्या वर्षी मतदानाचा हक्क दिला. देशाला आधुनिक विचार, जागतिक व्यासपीठांवर सन्मान मिळवून देण्याचं काम केलं. त्यांच्या रुपाने देशाला युवा, कर्तबगार, दूरदृष्टीचं, सुसंस्कृत नेतृत्वं लाभलं होतं. महान देशाचे महान पंतप्रधान म्हणून राजीव गांधी नेहमी स्मरणात राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीव गांधी जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करुन आदरांजली वाहिली.

राजीव गांधी यांची जयंती सद्‌भावना दिवस म्हणून साजरी होत आहे. तसेच 5 सप्टेंबरपर्यंत सामाजिक ऐक्य पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला सद्‌भावना दिनाच्या व सामाजिक ऐक्य पंधरवड्याच्याही शुभेच्छा दिल्या आहेत.

यानिमित्ताने वंश, धर्म, प्रदेश, भाषा असा कुठलाही भेद न राहता देशात एकता, समता, बंधुता, सौहार्दाची भावना वाढीस लागेल, हिंसाचारमुक्त समाजाच्या निर्मितीस मदत होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

कोरोना संकटकाळात ‘वर्क फ्रॉम होम’ करीत असताना हे ज्यामुळे शक्य झालं त्या डिजिटल क्रांतीची सुरुवात स्वर्गीय राजीव गांधींनी केली होती याची जाणीव ठेवून त्याबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे, अशी भावनाही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.