Pimpri : महापालिका आयुक्त हर्डीकर भाजपचे दलाल; शिवसेनेचा घणाघात

अतिक्रमण धारकांना नोटीस सोबत दिली खासदारांच्या पत्राची प्रत 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर हे नागरिकांचे सेवक असूनही ते भाजपचे दलाल असल्याप्रमाणे वागत आहेत. महापालिकेच्या आत्तापर्यंतच्या कार्यकाळातील सर्वाधिक निष्क्रिय आणि पक्षपातीपणा करणारे आयुक्त म्हणून हर्डीकर यांची ओळख झाली आहे, असा घणाघात शिवसेनेने केला.  अतिक्रमण धारकांना दिलेल्या नोटीसांसोबाबत शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या पत्राची प्रत महापालिकेने जोडून दिली आहे. याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात येणार असल्याचेही, त्यांनी म्हटले आहे. 

भोसरी मतदार संघातील अतिक्रमणावर कारवाई करण्याची मागणी शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली होती. आयुक्त हर्डीकर यांनी जुन्या व्यावसायिकांना नोटीसा दिल्या. त्यांच्या नोटीशीबरोबर खासदार आढळराव पाटील यांच्या पत्रांची झेरॉक्स जोडून वाटण्यात आल्या. त्यानंतर शिवसेने प्रसिद्धीपत्रक देऊन आयुक्त हर्डीकरांवर घणाघात केला आहे. पत्रके वाटून प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय गुंड खासदार आढळराव यांच्या बदनामीचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.

भोसरी परिसरामध्ये शासकीय जागा, तसेच रस्त्यालगत बेकायदा शेड मारून ते भाड्याने देण्याचे काम सध्या सुरू आहे. त्याठिकाणी राजकीय गुंड पोसण्याचे काम देखील काही मंडळी करीत आहेत. आळंदी रोड, भोसरी या भागात अशाप्रकारचे नव्याने बेकायदा पत्राशेड उभारण्यात आली आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी, असे लेखी पत्र शिवसेना खासदार आढळराव यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले होते.

परंतू, चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचे काम आयुक्तांकडून सुरू आहे. 20-25 वर्षांपासून व्यवसाय करणा-यांना जागा देणे अपेक्षित असताना त्यांना नोटीसा दिल्या जात आहेत. नव्या पत्राशेडजवळ स्थानिक गुंड उभे राहून माता-भगिनींची छेडछाड काढतात. तसेच नव्याने पत्राशेड उभारून रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे या पत्राशेडवर कारवाईसाठी खासदार आढळराव यांनी आयुक्तांना पत्र दिले. मात्र, आयुक्त हर्डीकर यांच्याकडून जुन्या व्यावसायिकांना नोटीसा देण्यात आल्या. त्यांच्या नोटीशीबरोबर खासदार आढळराव यांच्या पत्रांची झेरॉक्स जोडून वाटण्यात आल्या. त्यांच्याविषयी बदनामीचा केविलवाणा प्रयत्न राजकीय गुंड व अधिकारी करीत आहेत.

नव्याने उभारण्यात आलेल्या पत्राशेड काढून टाकावे. त्याठिकाणी होणारी लाईट व पाण्याची चोरी थांबवावी, अन्यथा शिवसेनेतर्फे जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट आणि महिला आघाडी जिल्हा संघटक सुलभा उबाळे यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.