Talegaon Dabhade : राष्ट्रवादीकडून मावळात बापूसाहेब भेगडे यांच्या नावाला पसंती!

(प्रभाकर तुमकर) 

एमपीसी न्यूज – उमेदवारीवरून सत्तारूढ भाजपमध्ये घमासान सुरू असतानाच मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते व इच्छुकांनी मात्र बापूसाहेब भेगडे यांच्या नावाला सर्वाधिक पसंती दिल्याचे चित्र पहायला मिळत आहे. विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक नाही असे काही दिवसांपूर्वी म्हणणाऱ्या बापूसाहेब भेगडे यांनीही ‘पक्ष देईल तो आदेश आपल्याला मान्य राहील’, अशी भूमिका आता घेतली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने बापूसाहेब भेगडे यांना 2009 मध्ये मावळातून उमेदवारी दिली होती. त्यावेळी त्यांनी भाजपच्या विरोधात चांगली चुरशीची लढत दिली होती. पक्षांतर्गत विरोधकांमुळे त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्या पराभवाचे उट्टे काढण्याची संधी दिली तर बापूसाहेब मावळातून राष्ट्रवादीला विजय मिळवून देतील, असा विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

वडगाव मावळ येथे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मावळ तालुका निरिक्षक विजय कोलते काल (शुक्रवारी) इच्छुकांशी चर्चा करून उमेदवाराच्या नावाबाबत चाचपणी करण्यासाठी आले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत उपस्थित सर्व इच्छुकांनी बापूसाहेब भेगडे यांच्या नावाला एकमताने मान्यता दिली. तालुक्यातील बहुतांश पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बापूसाहेब भेगडे यांच्या नावाला समर्थन आहे. मावळातून बापूसाहेब भेगडे हेच सक्षम उमेदवार राहतील, या शब्दांत त्यांच्याच नावाची शिफारस पक्षश्रेष्ठींकडे अनेक जाणकार व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी केली आहे.

विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी मावळमधून पक्षाकडे संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष व नगरसेवक गणेश खांडगे, किशोर भेगडे, जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, पुणे जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घोटकुले, तळेगावचे नगरसेवक संतोष भेगडे, शिवक्रांती कामगार संघटनेचे सरचिटणीस अॅड विजय पाळेकर, धडाडीच्या महिला नेत्या रूपाली दाभाडे आदी इच्छुकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अर्ज केले होते.

प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळी बापूसाहेब भेगडे व बाळासाहेब नेवाळे अनुपस्थित होते. बापूसाहेब भेगडे यांनी तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष किशोर भेगडे यांच्यासाठी शब्द टाकण्याची भूमिका घेतली होती. पुणे येथे झालेल्या या मुलाखतींच्या दरम्यान बहुतांश इच्छुकांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांचेकडे बापूसाहेब भेगडे यांनाच उमेदवारी द्यावी, अशी आग्रही मागणी केली होती. त्यानंतर या आठवड्यात  मुंबईत झालेल्या बैठकीतही उपस्थित इच्छुकांनी तीच भूमिका मांडली.

किशोर भेगडे यांच्याकडून प्रयत्नांची पराकाष्ठा

मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला आलेली मरगळ झटकण्यासाठी किशोर भेगडे यांनी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित करण्यासाठी आखाड पार्टीचे आयोजन केले होते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांना एकत्रित करून साजरा केला. पूरग्रस्तांना मदतीसाठी पुढाकार घेतला. मागच्या आठवड्यात युवक आक्रोश आंदोलनात प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यासह सक्रिय सहभागी झाले. त्यात किशोर भेगडे यांच्यावरही गुन्हा दाखल झाला.

गेल्या पाच दिवसापासून पवन मावळ, आंदर मावळ, लोणावळा खंडाळा आदी भागात जाऊन कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी चालू आहे. किशोर भेगडे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष मु-हे, मावळ तालुका युवक अध्यक्ष सुनील दाभाडे (शहरी) कैलास गायकवाड (ग्रामीण) तालुका युवक कार्याध्यक्ष सुनील भोंगाडे, माजी सरपंच विशाल वहिले, अल्पसंख्यांक अध्यक्ष अफताब सय्यद, ओबीसी सेल अध्यक्ष अतुल राऊत, पुणे जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शरद कुटे, नगरसेवक राजेंद्र कुडे, युवा नेते तुषार भेगडे,माजी सरपंच राकेश घारे,विठ्ठल तिकोणे, नवनाथ चोपडे, मावळ तालुका ओबीसी प्रभारी  मंगेश खैरे, ऋषीकेश काळोखे, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष विकी लोखंडे, हर्षल आंद्रे, शेखर कटके, तालुका युवक उपाध्यक्ष  स्वामी गायकवाड, माजी सरपंच राकेश मु-हे, आनंद पडवळ, माजी सरपंच राजेश वाघोले, मावळ तालुका ओबीसी सेलचे उपाध्यक्ष सोमनाथ धोंगडे, गोरख जांभुळकर, संतोष देशमुख आदी कार्यकर्ते गाव भेटी घेत आहेत. किशोर भेगडे यांच्या या सर्व प्रयत्नांचा फायदा बापूसाहेब भेगडे यांना होऊ शकतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.