IPL 2021: बातमी आयपीएलची – मुंबईसाठी राहिली दिल्ली खूपच दूर!

मिश्राच्या भेदक गोलंदाजीने मोडले मुंबई इंडीयन्सचे कम्बरडे

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) – मागच्या 20-20 च्या अंतिम सामन्यातल्या दोन संघामध्ये झालेल्या काल रात्रीच्या सामन्यात नवख्या रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने बलाढ्य मुंबई इंडियन्सवर सहा गडी राखून मोठा विजय मिळवला, जो दिल्लीचा मुंबईकडून सहा लागोपाठ झालेल्या पराभवानंतरचा विजय होता. लेगस्पिनर अमित मिश्रा आणि गब्बर उर्फ शिखर धवन यांनी दिल्ली संघाकडून लक्षवेधी कामगिरी केली.

20-20 च्या फॉरमॅटमध्ये कधीही कालच्या कामगीरीला काहीही अर्थ नसतो हे आतापर्यंत कितीतरी वेळा सिद्ध झालेले आहेच, आजही तीच अनुभूती रसिक प्रेक्षकांना आली.

मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून पुन्हा एकदा फलंदाजी घेतली आणि पुन्हा एकदा डीकॉकने निराशा केली. पहिल्या सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या लीनला बसवून अंतिम 11 जणांत समावेश केलेल्या डीकॉकने कर्णधारासह संघ व्यवस्थापनाला निराश करणारी कामगिरीच केली. आजही तो केवळ दोनच धावत करून बाद झाला.

त्याच्या जागी आलेल्या सूर्यकुमारच्या साथीने रोहित शर्माने डाव सावरायला सुरुवात केली.दोघेही उत्तम आणि पूर्ण भरात खेळत होते. त्यांनी जवळपास 58 धावांची भागीदारी सुद्धा केली होती. पूर्ण भरात असलेल्या रोहितची फलंदाजी बघण्यासारखा आनंद दुसरा कुठलाही नसतो, पण दिल्लीच्या रिषभ पंतने उत्कृष्ट नेतृत्व करताना अमित शर्माला गोलंदाजीसाठी आणले आणि याआधी सहावेळा रोहितला बाद करणाऱ्या अमित मिश्राने आजही रोहीतला मामा बनवले.

एकाच षटकात त्याच्यासह आक्रमक हार्दिक पंड्यालाही बाद करून मुंबई संघाच्या गोटात एकच खळबळ उडवली आणि यानंतर मुंबईचा डाव नाही तो नाहीच सावरला आणि तीन बाद 76 वरून सर्वबाद 135 अशी त्यांची दुर्दशा उडाली.

दिल्लीच्या मिश्रा व आवेश खानने चांगली गोलंदाजी केली असली तरी मुंबईच्या सर्वच फलंदाजानी एकदम आत्मघाती फलंदाजी करून आपल्या विकेटस फेकल्याखास करून रोहित आणि हार्दीकने. हार्दिकने तर आल्या आल्या अमित शर्माला मिडविकेटवरुन फेकण्याचा प्रयास केला, तो खूपच घातक ठरला. बाकीचे फलंदाज केवळ आले आणि भोज्याला हात लावून गेले. परिणामी बलाढ्य म्हणवणारे मुंबई इंडियन्स केवळ 135 चे तुटपुंजे लक्ष्यच उभे करू शकले.

अर्थात जसे की नेहमी म्हटले जाते मुंबई इंडियन्सचा संघ सर्वार्थाने मजबूत आहे आणि खास करून त्यांची भेदक गोलंदाजी. बुमराह, ट्रेंट बोल्ट आणि या स्पर्धेत सर्वांना आपल्या कामगिरीने आकर्षित करून घेणारा राहुल चहर. यांच्या विरुद्ध 135 धावा सुध्दा खूप वाटाव्यात असे भेदक आक्रमण हे तिघे करतात.

त्याला कृणाल पंड्या, जयंत यादव साथ देतात, या समजाला खात्री देणारी कामगिरी करतील, अशी अपेक्षा मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना होती, मात्र दिल्लीच्या नवोदित कर्णधाराने आपल्या संघात उत्तम जान फुंकली आहे. त्यात शिखर धवन त्याच्या सर्वोच्च फॉर्ममध्ये आहे. पृथ्वी शॉला मात्र आक्रमण आणि संयम याची सांगड घालता येत नाही. याच सातत्यहीन कामगिरीने त्याने राष्ट्रीय संघातले स्थान गमावले आहेच, इथेही त्याला तीच भीती आहे,जयंत यादवला आक्रमक होत मारण्याची घाई त्याला नडली, पण यानंतर धवन आणि स्मिथ ने उत्तम भागीदारी करत संघाला विजयासमीप आणले.

जिंकण्यास 36 आणखी धावा हव्या असताना शिखर धवन वैयक्तिक 45 धावांवर बाद झाला आणि पाठोपाठ पंत सुध्दा. त्यामुळे उर्वरित चार षटकांत बुमराह आणि बोल्ट पुन्हा काही चमत्कार करतील अशी आशा वाटत असताना बुमराहने मात्र ‘तू ही बिगाडे, तू ही बिगाडे’ अशी गोलंदाजी करत 19व्या षटकात दोन नोबॉल टाकले आणि दिल्ली संघाला विजय खुणावू लागला.

आपला देशबांधव असलेल्या पोलार्डच्या पहिल्या दोन चेंडूतच सिमरन हेटमायरने विजयाच्या औपचारिकता पूर्ण केली आणि तब्बल सहा पराभवांनंतर दिल्ली कॅपिटल्सने बलाढ्य मुंबई संघाला पराभूत करून विजय प्राप्त केला.

आयपीएलमध्ये लसीत मलिंगाच्या 170 विकेटचा विक्रम गाठण्यासाठी केवळ सहा विकेट्स हव्या असणाऱ्या अमित मिश्राने आज चार षटकात चार गडी बाद केले. त्यालाच सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.