Nigdi News: देशाची फाळणी अपरिहार्य होती – डॉ. बालाजी चिरडे

एमपीसी न्यूज – अखंड भारत ही कितीही चांगली आणि भावनाप्रधान संकल्पना असली तरी देशाची फाळणी व्यवहार्य अन् अपरिहार्य होती, असे मत प्रा. डॉ. बालाजी चिरडे यांनी व्यक्त केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आयोजित पाच दिवसीय छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फाळणीविषयक दृष्टिकोन’ या विषयावरील अंतिम पुष्प गुंफताना प्रा.डॉ. बालाजी चिरडे बोलत होते. माजी खासदार प्रदीप रावत, ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे धनंजय कुलकर्णी, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथन नायर, सचिव प्रदीप पाटील यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. व्याख्यानापूर्वी, प्रा.डॉ. बालाजी चिरडे लिखित ‘1857: सावरकरांची भूमिका’ आणि ‘त्रिकालवेध’ या दोन पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

प्रा. डॉ. बालाजी चिरडे म्हणाले की, “भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव जवळ येऊन ठेपला असला तरी देशाच्या फाळणीचा विषय अजूनही संपलेला नाही. फाळणीचे दु:ख अजूनही बहुसंख्य भारतीयांच्या मनांत आहे. मुस्लीम लीगने 23 मार्च 1940 रोजी फाळणीच्या विषयाला प्रारंभ केला. त्याच काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘पार्टिशन ऑफ इंडिया’ हा ग्रंथ प्रकाशित झाला. या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी फाळणीच्या भूमिकेविषयी सविस्तर ऊहापोह केला आहे. मुळात मुस्लीम संस्कृती ही हिंदू संस्कृतीपेक्षा वेगळी आहे. त्यांना अखंड भारतातील सर्व आस्थापनांमध्ये पन्नास टक्के आरक्षण हवे होते. याशिवाय आपले वेगळे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी अनेक गोष्टींची मागणी केली होती. सन 1920 ते 1940 या काळात हिंदू आणि मुस्लीम यांच्यामध्ये झालेल्या सर्व दंगलींचा अभ्यास करून त्याची सविस्तर माहिती बाबासाहेबांनी दिली होती.

‘दारूल इस्लाम’ (मुस्लीम सत्ता) आणि ‘दारूल हरब’ (मुस्लिमेतर समाज) या दोन भागांत मुस्लिमांनी जगाची विभागणी केली होती. त्यांना अखंड भारतापेक्षा आपल्या सार्वभौम सत्तेमध्ये स्वारस्य होते. त्यामुळे देशाची फाळणी करणे, हाच सर्वोत्तम पर्याय होता. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अखंड हिंदुस्थानाचे स्वप्न पाहिले होते. असंतुष्ट मुस्लिमांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात म्हणजे तेवीस टक्के आरक्षण द्यावे, असे सावरकरांचे मत होते. याशिवाय एक व्यक्ती, एक मत ही त्यांची भूमिका होती. अखंड हिंदुस्थानात मुस्लिमांना ती मान्य होण्यासारखी नव्हती. त्यामुळे देशाची फाळणी अपरिहार्य होती अन् अप्रत्यक्षरीत्या सावरकरांना ती मान्य करावी लागली, असेही ते म्हणाले.

प्रदीप रावत यांनी आपल्या मनोगतातून, “समाज हा एकाच वेळी भौतिक अन् नैतिकदृष्ट्या प्रगत होत गेला पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन प्रभृती म्हणजे भारतातील प्रबोधनयुगाची देणगी होती. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर हे बहुजन, दलित समाजाला समजले पाहिजेत; तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलितेतर सवर्ण समाजापर्यंत पोहचले पाहिजेत!” असे विचार मांडले. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ संचालित रवींद्रनाथ ठाकूर सार्वजनिक ग्रंथालयाचे सहकार्यवाह श्रीराम रानडे यांनी प्रास्ताविकातून सदतीस वर्षे कार्यरत असलेल्या रवींद्रनाथ ठाकूर सार्वजनिक ग्रंथालयाची माहिती दिली. चंद्रशेखर जोशी आणि गीता खंडकर यांनी पाहुण्यांचा आणि वक्त्यांचा परिचय करून दिला.

सतीश सगदेव यांनी सूत्रसंचालन केले.सामुदायिक राष्ट्रगीताने व्याख्यानमालेची सांगता करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.