MLA Anna Bansode : ‘माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा कार्यकाळ संशयास्पद’

आमदार अण्णा बनसोडे यांचे पोलीस आयुक्तांना पत्र

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड शहराचे तिसरे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची मुंबई येथे बदली झाली. त्यानंतर पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी त्यांचा कार्यकाळ संशयास्पद होता. त्यामुळे आपण शहातील गुंडगिरी अवैध धंदे, लँडमाफिया यांना आवर घालून शहरात सुरक्षित व शांततेचे वातावरण निर्माण करावे, असे पत्र पिंपरीचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे (MLA Anna Bansode) यांनी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना दिले आहे.

आमदार बनसोडे (MLA Anna Bansode) यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पिंपरी- चिंचवड शहरात देशाच्या विविध भागातून कामासाठी नागरिक आले आहेत. शहरातील नागरिकांना पोलिसांनी संरक्षण द्यावे, दहशत गुंडागर्दी, अवैध धंदे याचा बंदोबस्त करावा, वाहतूक सुरक्षित असावी, खून, दरोडे, मारामारी असे प्रकार घडू नयेत. याबाबत आपण कारवाई कराल, अशी आम्हास खात्री आहे.

IPS Krishna Prakash : दोनशे कोटी रुपयांच्या आरोपाचे व्हायरल पत्र केवळ बदनामीसाठी!

यापूर्वी शहरात अवैध धंद्याचा सुळसुळाट झाल्याने कृष्ण प्रकाश यांची बदली करण्यात आली. त्यानंतर कृष्ण प्रकाश यांनी शहरातील अवैध धंदे बंद करून दहशत मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र काही कालावधीनंतर खोटे गुन्हे नोंदवणे, नामांकित बँकांच्या पदाधिका-यांवर एकाच वेळी अनेक गुन्हे दाखल करून मोठी रक्कम उकळणे, बिल्डरांनी सामान्य जमीन मालकांची फसवणूक करून घेतलेल्या जमिनीवर पोलीस बळाचा वापर करून ताबा मिळवून देणे, बदल्यात भागीदारी घेणे, फ्लॅट घेणे, झोपडपट्टीत राहणा-या गरीब मुलांवर खोटे गुन्हे दाखल करून गुन्हेगार निर्माण होण्यासाठी कृत्रिम वातावरण निर्माण करायचे असे प्रकार सुरु झाले, असे आमदार बनसोडे (MLA Anna Bansode) यांच्या पत्रात म्हटले आहे.

सवंग प्रसिद्धीचा हव्यास

पूर्वीच्या आयुक्तांचा कार्यकाल हा अत्यंत संशयास्पद असून केवळ प्रसिद्धी मिळवून दुस-या अधिका-यांनी केलेली कामगिरी स्वतःच्या नावावर घेऊन स्वतःची सवंग प्रसिद्धी मिळवून सामान्य जनतेत नावलौकिक मिळवायचा. मोकळे भूखंड, बिल्डर यांच्यावर दहशत निर्माण करून पार्टनरशिप व कमी किमतीत फ्लॅट खरेदी करण्याचे गैरप्रकार झाले आहेत. चांगल्या वित्तिय संस्थांचा सिव्हिल मॅटर असताना अशा प्रकरणी गुन्हे दाखल करून काही कोटी रुपये उकळले गेले आहेत. मसाज सेंटरमध्ये वेश्या व्यवसायात सापडलेल्या मुलींचा गैरवापर झाल्याच्या तक्रारी आपल्यापर्यंत पोहोचल्या असल्याचा उल्लेख देखील बनसोडे यांनी दिलेल्या पत्रात आहे.

Krishna Prakash : कृष्ण प्रकाश यांच्या विरोधातील ‘ते’ पत्र बनावट असल्याचा दावा

आपण प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहणारे व काम करणारे अधिकारी असल्याने शहरातील गुंडगिरी, अवैध धंदे, लँडमाफियाला आवर घालून शहरात शांततेचे व सुरक्षित वातावरण निर्माण करावे,  अशी मागणी देखील आमदार अण्णा बनसोडे यांनी नवीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडे केली आहे.

अगोदर कृष्ण प्रकाश यांच्याबाबतचे पत्र व्हायरल, आता आमदार महोदयांचे निवेदन

सुरुवातीला पिंपरी चिंचवड पोलीस दलातील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या नावाने लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. ते पत्र थेट मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. त्यामध्ये कृष्ण प्रकाश यांनी संबंधित अधिका-यामार्फत अनेक गैरव्यवहार केले असल्याचे म्हटले होते. मात्र हे पत्र बनावट असून याच्याशी आपला काहीही संबंध नसल्याचे संबंधी सहाय्यक निरीक्षकाने सांगितले. त्यानंतर आता पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी देखील कृष्ण प्रकाश यांच्यावर त्यांनी काही गैरव्यवहार केले असल्याचे आरोप केले आहेत. याबाबत आमदार बनसोडे यांनी नवीन पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे. यामुळे कृष्ण प्रकाश यांच्या कार्यकाळात नेमकं काय घडलं, हे अजूनही गुलदस्त्यात आहे. मात्र या प्रकरणामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.