IPS Krishna Prakash : दोनशे कोटी रुपयांच्या आरोपाचे व्हायरल पत्र केवळ बदनामीसाठी!

एमपीसी न्यूज – पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (IPS Krishna Prakash) यांची बदनामी करणारे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे पत्र बनावट असल्याचे त्या पत्रात अर्जदार म्हणून नाव असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे यांनी सांगितले. तसेच संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी देखील डोंगरे यांनी केली. त्यानंतर तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी देखील त्यांची बाजू मांडली आहे.
काय म्हणाले कृष्ण प्रकाश?  
कृष्ण प्रकाश यांनी म्हटले आहे, की पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे यांच्या नावाचा गैरवापर करून माझ्या पोलीस आयुक्त पदाच्या कारकिर्दीत आपल्याकडून चुकीची कामे करून घेतल्या बाबतचा तक्रारी अर्ज सोशल मीडियावर आज दिवसभर व्हायरल होत आहे.
सदर पत्र हे पूर्णतः खोटे असून, या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे यांनीच लेखी तक्रार अर्ज पोलीस आयुक्तांकडे दिला असल्याने सदर लेटर हे केवळ आणि केवळ माझी बदनामी करण्यासाठी लिहिण्यात आले असल्याचे स्पष्ट होत आहे. अशा प्रकारची बदनामी करण्याचे प्रयत्न यापूर्वी देखील वारंवार केले गेले होते व ते असफल ठरलेले आहेत.

आयुक्त म्हणून काम करत असताना नागरिकांचे प्रेम
पिंपरी चिंचवड आयुक्त म्हणून काम करत असताना नागरिकांचे सर्वाधिक प्रेम, आपुलकी व आशीर्वाद मिळाले असल्यामुळे अशा प्रकारचे विघ्नसंतोषी लोकांचे आरोपांना फारशी किंमत न देता त्यावर कायदेशीर कारवाई करण्यावरच मी भर देणार आहे. तसेच, जे कोणी माझी अशा प्रकारची बदनामी करू इच्छितात; त्यांनी ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे, की “ मी माझ्या कर्तव्यनिष्ठ कामगिरीमुळे नागरिकांच्या मनात चांगले स्थान निर्माण करू शकलो व पोलीस दलाची प्रतिमा कायम उज्वल करू शकलो. त्याला धक्का लावणे माझे कायदेशीर व अनुशासनात्मक कारवाईमुळे दुखावलेल्यांना कदापि शक्य नाही,” असेही कृष्ण प्रकाश (IPS Krishna Prakash) यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.