Nigdi News: 15 दिवसात वीज पुरवठा सुरळीत करा, अन्यथा महावितरणच्या कार्यालयावर विराट मोर्चा – सचिन चिखले

प्रभाग 13 मधील त्रस्त नागरिकांचा विद्युत अधिकाऱ्यांवर हल्लाबोल

एमपीसी न्यूज – महावितरण प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे निगडीतील यामुनानगर, साईनाथनगर, सेक्टर 22 ओटा स्कीम भागात विजेचा लपंडाव सुरूच आहे. नगरसेवकांनी महावितरणच्या निगडी उपविभागीय कार्यालयात तक्रारी करूनही नागरिकांच्या मागे शुक्लकाष्ठ कायम आहे. आमदार महेश लांडगे आणि नगरसेवक सचिन चिखले यांच्या माध्यस्तीने विद्युत अधिकाऱ्यांना तंबी देण्यात आली आहे. येत्या 15 दिवसात वीजपुरवठा सुरळीत करावा. अन्यथा निगडीतील विद्युत कार्यालयावर प्रभाग 13 मधील नागरिकांचा विराट मोर्चा आणला जाईल, असा इशारा नगरसेवक सचिन चिखले यांनी दिला.

गेल्या कित्येक दिवसांपासून यामुनानगर, साईनाथनगर, सेक्टर 22 ओटा स्कीम भागात विजेच्या समस्या वाढल्या आहेत. नागरिकांच्या तक्रारी वाढल्यामुळे नगरसेवक सचिन चिखले यांनी विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे तक्रारी केल्या. निवेदने देऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. तरीही, या भागातील विद्युत पुरवठा खंडित होत राहिला. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नगरसेवकांनी विचारल्यानंतर फिडर गेला आहे, ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त आहे, अशी उत्तरे देऊन टोलवाटोलवी केली जात आहे. नागरिकांच्या संयमाचा बांध फुटल्याने नगरसेवक चिखले यांनी विद्युत अधिकाऱ्यांना प्रभागातच बोलावून घेतले.

स्व. मीनाताई ठाकरे क्रीडांगणावर आमदार महेश लांडगे यांच्या माध्यस्तीने नागरिकांच्या समोर महावितरणच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. वीजपुरवठा खंडित होण्याची कारणे विचारण्यात आली. यामुनानगर भागात कामगार वर्ग मोठ्या संख्येने राहतो. त्यातील अनेकांचे काम ऑनलाइन सुरू आहे. सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने त्यांच्या कामात खोळंबा होत आहे. सध्या शाळा ऑनलाइन सुरू आहेत. विद्यार्थी घरी बसून ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. आशा काळात वीज पुरवठा सुरळीत होणे गरजेचे आहे, असे चिखले म्हणाले.

यावेळी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी विद्युत अधिकाऱ्यांना पंधरा दिवसाचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. 15 दिवसात वीज पुरवठा सुरळीत करण्याची हमी अधिकाऱ्यांनी दिली आहे. यावेळी नगरसेवक उत्तम केंदळे आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.