Nigdi : कोयत्याने मारहाण करणाऱ्या पतीवर गुन्हा

एमपीसी न्यूज – घरातील किरकोळ कारणावरून पत्नीला व मुलाला मारहाण करणाऱ्या पतीवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार चिंचवडमधील संभाजीनगर परिसारत शनिवारी (दि. 14) सकाळी नऊ ते दुपारी दोनच्या दरम्यान घडला.

कोमल रवींद्र पवार (वय 34, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रवींद्र भिकाजी पवार (वय 38) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातील किरकोळ कारणावरून आरोपी रवींद्र याने पत्नी कोमल यांना शिवीगाळ केली तर मुलगा सार्थक याला लोखंडी रोडने मारहाण केली. त्यावरून कोमल आणि सार्थक हे दोघेजण पोलिसात तक्रार देण्यासाठी निघाले. ‘पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी जाते का?’ असे म्हणून रवींद्र याने कोमल यांच्या पायावर कोयत्याने मारले. यामध्ये त्यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर आरोपीने लोखंडी कपाट फोडून कोमल आणि सार्थक यांचे कपडे जाळले.

या प्रकारानंतर दुपारी दोनच्या सुमारास कोमल यांचे सासरे भिकाजी हरी पवार (वय 73) त्यांच्या घरी आले. त्यांनी आरोपी रवींद्रला समजावण्याचा प्रयत्न केला असता रवींद्र याने वडिलांना देखील शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.