Lockdown Guidelines : आजपासून राज्यात रात्रीची जमावबंदी, जाणून घ्या काय आहेत नवे नियम 

एमपीसी न्यूज – राज्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आज (रविवार, दि. 28) रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. यादरम्यान रात्री आठ ते सकाळी सात वाजेपर्यंत पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. नियमाचे उल्लंघन केल्यास एक हजार रुपये एवढा दंड ठोठावला जाणार आहे. राज्य सरकारने याबाबत नव्याने नियमावली जाहीर केली आहे.

काय आहेत नवे नियम 

– पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना रात्री 8 ते सकाळी 7 या दरम्यान एकत्र येण्यास मनाई आहे.

– या वेळेत सागरी किनारे, उद्याने, बागा बंद राहतील.

– कुठलेही सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम, मेळाव्यांना परवानगी नाही. सभागृह, नाट्यगृहे या कारणांसाठी उपयोगात आणता येणार नाही.

– सर्व एक पडदा व मल्टीप्लेक्समधील चित्रपटगृहे, मॉल्स, सभागृहे, उपाहारगृहे रात्री 8 ते सकाळी 7 बंद राहतील.

– या वेळेत टेक होम डिलिव्हरी सुरू राहील.

– विवाह समारंभासाठी 50 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई असेल.

– अंत्यसंस्कारासाठी 20 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊ शकणार नाहीत.

– सर्व धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनाने दर तासाला कमाल किती भाविक असावेत ते निश्चित करावे.

– त्या ठिकाणी वावरण्यास पुरेशी जागा व आरोग्याचे नियम पाळले जात आहेत किंवा नाहीत ते सुनिश्चित करावे.

– ऑनलाईन आरक्षणावर भर द्यावा.

– होम आयसोलेशनच्या बाबतीत उपचार करणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकाची माहिती स्थानिक प्रशासनाला द्यावी लागेल.

– कोविड रुग्ण असल्याबाबत संबंधित स्थळी दरवाज्यावर 14 दिवसांसाठी तसा सुचना फलक लावण्यात येईल.

– गृह विलगीकरण शिक्काही रुग्णाच्या हातावर मारण्यात येईल.

– खासगी आस्थापनांत (आरोग्य व आवश्यक सेवा वगळून) 50 टक्क्यांपर्यंत कर्मचारी उपस्थित ठेवता येतील तर शासकीय व निमशासकीय कार्यालयातील विभाग किंवा कार्यालय प्रमुख कोविड परिस्थितीनुसार कर्मचारी संख्या निश्चित करतील.

– उत्पादन क्षेत्र मात्र पूर्ण क्षमतेने काम सुरू ठेवू शकते.

– शासकीय कार्यालयांतील गर्दी कमी करण्यासाठी अभ्यागत नागरिकांना अगदी आवश्यक आणि तत्काळ कामांसाठीच प्रवेशाची परवानगी देण्यात येईल.

– बैठका आदी कामासाठी निमंत्रित केले असल्यास विशेष प्रवेश पास कार्यालयामार्फत दिला जाईल हे कार्यालय किंवा विभाग प्रमुखाने पहावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.