Pune News : आता थेट हॉस्पिटलला ‘रेमडेसिवीर’ पुरवठा, विभागीय आयुक्तचा निर्णय

एमपीसी न्यूज : करोना बाधितांना ‘रेमडेसिवीर’ इंजेक्‍शन हॉस्पिटलमध्ये देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासन दु-सूत्री कार्यक्रम राबवणार आहे. त्यामध्ये थेट हॉस्पिटलला ‘रेमडेसिवीर’ पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे औषध दुकानांसमोर होणारी गर्दी थांबणार आहे. शिवाय, शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक दर हॉस्पिटलला आकारता येणार नाही, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.   

औषधाची कृत्रिम टंचाई निर्माण करून नागरिकांना पॅनिक करू नये. आपल्याकडे पुरेशा प्रमाणात रेमडेसिवीर इंजेक्‍शन आहे. शासनाच्या धोरणाप्रमाणे जेवढे ऍक्‍टिव्ह रुग्ण आहेत, तेवढ्या प्रमाणात हे इंजेक्‍शन उपलब्ध होत आहे. त्यामुळे यापुढे ‘रेमडेसिवीर’ औषध दुकानात मिळणार नाही. रूग्णालयांनीही रूग्णांच्या नातेवाईकांना हे इंजेक्‍शन बाहेरून आणण्यास सांगू नये. रुग्णालयांची त्याची मागणी प्रशासनाकडे पाठवावी, त्यानुसार इंजेक्‍शनचा पुरवठा करण्यात येईल असे राव म्हणाले,

दरम्यान, शासकीय रुग्णालयात दोनपैकी एकाला रेमडेसिवीर द्यावे लागत आहे. तर, खासगी रुग्णालयात सर्वच रुग्णांना दिले जात आहे. ट्रीटमेंट प्रोटोकॉलमध्ये बाधित व्यक्तीला खरंच रेमडेसिवीरची गरज असेल, तरच द्यावे. याबाबत खासगी रुग्णालयांशी चर्चा करणार आहोत. पुढील तीन दिवसांत औषध दुकानांसमोरील ही गर्दी कमी होईल, अशी माहिती राव यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.