Odisha Train Accident : ओडिसामध्ये तीन रेल्वेगाड्यांचा भीषण अपघात, 50 प्रवाशांचा मृत्यू, 350 हून अधिक जखमी

एमपीसी न्यूज – ओडिसाच्या बहनागा स्टेशनजवळ आज (शुक्रवारी) संध्याकाळी कोरोमंडल एक्स्प्रेसचा भीषण अपघात (Odisha Train Accident) झाला आहे. या अपघातामध्ये 50 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 350 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. कोरोमंडल एक्स्प्रेस समोरून येणाऱ्या मालगाडीला धडकली, यानंतर ट्रेनचे डबे दुसऱ्या ट्रॅकवर गेले. दुसऱ्या ट्रॅकवरूनही ट्रेन येत होती, त्यामुळे दोन नाही तर तीन ट्रेनचा अपघात झाला आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या या मार्गावरून जाणारी रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे. 

संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसने मालगाडीला धडक (Odisha Train Accident) दिली, यानंतर कोरोमंडल एक्स्प्रेसचे डबे दुसऱ्या ट्रॅकवर गेले. यानंतर काहीच वेळात यशवंतपूर-हावडा एक्स्प्रेस दुसऱ्या ट्रॅकवरून येत होती. या ट्रेनने कोरोमंडल एक्स्प्रेसच्या ट्रॅकवर आलेल्या डब्यांना धडक दिली, ज्यामुळे यशवंतपूर-हावडा ट्रेनचे तीन-चार डबे घसरले, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडून 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

प्रशासनाने अपघाताबाबत (Odisha Train Accident) आपत्कालीन नियंत्रण कक्ष क्रमांक 6782262286 जारी केला आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

Maharashtra News : किल्ले रायगडाच्या पायथ्याशी 45 एकरात उभारणार शिवसृष्टी; राज्य शासन देणार 50 कोटींचा निधी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.