Chinchwad : धारदार शस्त्राचा धाक दाखवून चोरी करणाऱ्या एकाला अटक

गुन्हे शाखा युनिट 5 व सायबर सेलची संयुक्त कामगिरी

एमपीसी न्यूज – धारदार शस्त्राचा धाक दाखवून चोरी करणाऱ्या तीन अल्पवयीन बालकांना ताब्यात घेतले असून त्यांच्या एका साथीदाराला अटक करण्यात आली आहे. चौघांकडून 46 हजार रुपये किमतीचे चार मोबाईल फोन जप्त केले. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट पाच आणि सायबर सेल यांनी संयुक्तपणे केली.

गौतम उर्फ दादा दीपक कदम (वय 19, रा. बौद्धनगर पिंपरी), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासोबत त्याच्या तीन अल्पवयीन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 जुलै रोजी ऑटोक्लस्टर समोरून काळेवाडीकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर तीन जणांनी मिळून मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या डॉ. अभिजीत निर्मल शहा यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून लुटले. आरोपींनी शहा यांच्याकडून मोबाईल फोन हिसकावून नेला. याबाबत शहा यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या गुन्ह्याचा तपास चिंचवड पोलिसांसह सायबर सेल आणि गुन्हे शाखा युनिट पाच यांनी केला.

सायबर सेलने केलेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच्या इतर दोन साथीदारांसह मिळून शहा यांना लुटण्याचा गुन्हा केल्याचे सांगितले. एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतल्याचे समजताच त्याच्या दोन साथीदारांनी पळ काढला. पळून गेलेल्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्या तिघांनी मिळून हा गुन्हा केल्याचे सांगितले. तसेच तिघांनी गौतम याच्यासोबत मिळून पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारचा गुन्हा केल्याचे सांगितले.

पोलिसांनी गौतम कदम याला देखील अटक केली. चौघांकडून 46 हजार रुपये किमतीचे चार मोबाईल फोन जप्त केले. या कारवाईमुळे चिंचवड, वाकड पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक आणि पिंपरी पोलीस ठाण्यातील दोन असे एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक नीलेश बोडखे, पोलीस कर्मचारी मयुर वाडकर, फारुख मुल्ला, संदीप ठाकरे, अतुल लोखंडे, रितेश बिच्चेवार, नाजुका हुलावळे, धनराज किरनाळे, स्वामीनाथ जाधव, भरत माने, दयानंद खेडकर, भास्कर भारती, शामसुंदर गुट्टे, राजकुमार इघारे व ज्ञानेश्वर गाडेकर यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.