One Day Match : दणदणीत विजयासह विंडीजने आणली मालिकेत रंगत

एमपीसी न्यूज: (विवेक कुलकर्णी) अतिशय संक्रमण अवस्थेतून जात (One Day Match) असलेल्या विंडीज क्रिकेटमध्ये आलेली मरगळ काही प्रमाणात का होईना कमी झाली आहे. याला कारण म्हणजे दुसऱ्या एकदिवशीय सामन्यात विंडीज संघाने भारताचा 6 गडी राखुन दणदणीत पराभव केला.

कर्णधार होप आणि कार्टी(नावच आहे) यांनी 5 व्या गड्यासाठी केलेल्या महत्वपुर्ण भागीदारीच्या जोरावर यजमान संघाने भारतीय संघावर 6 गडी आणि 14 षटके राखून दणदणीत विजय मिळवत तीन सामन्याच्या मालिकेत 1 -1 अशी बरोबरी करत मालिकेत रंगत निर्माण केली आहे.

काल झालेल्या बार्बाडोसच्याच मैदानावर विंडीज संघाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले. भारतीय संघाने काल संघात काहीसे भविष्याच्या दृष्टीने योग्य पण मालिकेच्या मध्यावरच अनाकलनीय बदल केले. कर्णधार रोहित आणि अनुभवी विराटला विश्रांती देत संघाने हार्दिक पंड्याच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी टाकली.

शुभमन गील आणि ईशान किशन जोडीने होपचा निर्णय चुकला असे वाटावे, अशी शानदार सुरुवात केली. या जोडीने पहिल्या गड्यासाठी 90 धावांची मोठी भागीदारी करुन मोठया धावसंख्येकडे कूच केलीच होती की या सुंदर सुरुवातीला दृष्ट लागली की काय अशीच परिस्थिती निर्माण झाली.

गीलला आपली लय सापडली आहे असे वाटत असतानाच तो मोतीची शिकार ठरला.  गीलने 34 धावा काढल्या. यानंतर सलग दुसऱ्या सामन्यात दुसरं अर्धशतक पूर्ण करणारा ईशानही 55 धावा काढून शेफोर्डची शिकार झाला. त्याने इतक्याच चेंडूंत या धावा काढताना 6 चौकार आणि एक षटकार मारला.

यानंतरही भारतीय संघ व्यवस्थापणाने आपले प्रयोग चालूच ठेवले. अक्षर पटेलला फलंदाजीत दिलेली बढती उपयुक्त ठरली नाहीच, तो 8 चेंडूत फक्त 1 च धाव काढली. त्यानंतर पंड्या आणि सॅमसनही जोडी भारतीय संघाला या संकटातून बाहेर काढेल असे वाटत होते पण तसे काही झाले नाही.

Pune : मेट्रो स्टेशनचे नाव छत्रपती शिवाजी महाराजनगर करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनेचे आंदोलन

दोघेही लागोपाठ बाद झाले अन भारतीय संघ नाबाद 90 वरुन 5 बाद 97 अशा बिकट संकटात सापडला. सुर्यकुमार आणि जडेजा तरी आपल्या लौकिकास जागावेत असे वाटत होते. मात्र, ही आशा सुद्धा फोलच ठरली. कुमार आजही तळपणारा सूर्य नाहीच ठरला त्याने फक्त 24 धावा केल्या तर जडेजा सुद्धा फक्त 10 च धावा करु शकला.

भारतीय संघ पाऊणेदोनशे तरी धावा करेल की नाही ही भिती वाटत असतानाच शार्दूल ठाकूर ,कुलदीप जोडीने कसेबसे संघाला 182 धावाचे बऱ्यापैकी लक्ष गाठून दिले.बलाढ्य भारतीय संघ 50 तर सोडाच 45 षटके ही खेळू शकला नाही. अवघ्या 40.5 षटकातच भारतीय संघ गारद झाला.

विंडीज संघाकडून मोतीने आजही अतिशय भेदक गोलंदाजी करत भारतीय फलंदाजांना त्रस्त केले. त्याने 36 धावा देत 3 गडी बाद केले, त्याला शेफोर्डनेही तितकेच बळी मिळवत उत्तम साथ दिली तर जोसेफने दोन गडी बाद केले.

या आव्हानाचा पाठलाग करताना मेयर आणि किंग या जोडीने धडाकेबाज सुरुवात केली. मेयरने तर काही अप्रतिम फटके मारत भारतीय गोलंदाजांवर चांगलेच दडपण आणले. तो डोईजड होतोय असे वाटत असतानाच ठाकूरने आपली कमाल दाखवत एकाच षटकात त्याला आणि किंगला बाद करून विंडीजला दोन मोठे धक्के दिले.

मेयरने 28 चेंडूत 4 षटकार आणि दोन षटकार मारत 36 धावा केल्या. यानंतर ठाकूरनेच (One Day Match) अथानजेलाही ईशानच्या हातून बाद करुन तिसरे यश मिळवले. यानंतर कर्णधार होप आणि हेटमायर जोडी मैदानात होती. पण कुलदीपने हेटमायरला एका जबरदस्त चेंडूवर त्रिफळाबाद करून विंडीजला चौथा आणि मोठा धक्का दिला.

यावेळी वाटले होते की भारतीय संघ विंडीजला आजही पराभूत करेल, पण होप आणि कार्टी या जोडीने जबरदस्त भागीदारी करत भारतीय संघाला निराश करत संघाला विजय मिळवून देत तीन सामन्याच्या मालिकेत 1 /1 अशी बरोबरी करून मालिका रंगतदारच होईल हे निश्चित केले. होपने कर्णधारपदाला न्याय देणाऱ्या होपने शानदार अर्धशतक पूर्ण केले तर कार्टीनेही नाबाद 48 रहावा काढत त्याला उत्तम साथ दिली.

या 85 धावांच्या नाबाद आणि बहुमोल भागीदारीमुळे विंडीज संघाने 6 गडी आणि 80 चेंडू राखून संघाला मोठा विजय मिळवून दिला. आता मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना येत्या मंगळवारी होईल ज्यात विजयी होणारा संघ मालिकेचाही जेता होईल.

संक्षिप्त धावफलक
भारत
40.5 षटकात सर्वबाद 182
किशन 55,गील 34,सुर्या 24,ठाकूर 18 जडेजा 10
मोती 36/3,शेफोर्ड 37/3
पराभूत विरुद्ध
विंडीज
36.4 षटकात
4 बाद 183
मेयर 36,किंग 15,होप नाबाद 63,कार्टी नाबाद 48
शार्दूल 42/3,कुलदीप 30/1

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.