Pimpri : पाच वेगवेगळ्या अपघातात पाचजण जखमी; एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात तळेगाव एमआयडीसी, तळेगाव दाभाडे, सांगवी आणि चाकण परिसरात पाच अपघाताच्या घटना घडल्या. यामध्ये पाचजण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. याबाबत बुधवारी (दि. 19) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली घटना इंदोरी टोल नाक्यासमोर मंगळवारी (दि. 18) रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली. या अपघातात संतोष नामदेव शेटे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी संजय गुताजी लवंगे (वय 42, रा. बधलवाडी, ता. मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एम एच 06 / ए झेड 5464 या कार चालकाने भरधाव वेगात कार चालवून संतोष यांना धडक दिली. त्यात संतोष यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती न देता आरोपी कार चालक पळून गेला.

दुसरी घटना 16 फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वापाच वाजता इंदोरी गावाजवळ घडली. याप्रकरणी पोलीस हवालदार अशोक आंबेकर यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, योगेश हिरामण हुडारे (वय 26, रा. देहूगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी त्याच्या कार (एम एच 12 / सी आर 4203) मधून जात होता. रस्त्याने जात असलेल्या वाहनाला ओव्हरटेक करत असताना विरुद्ध दिशेने वाहन चालवून समोरून येणा-या एम एच 12 / सी डब्ल्यू 0067 या बसला जोरात धडक दिली. यामध्ये आरोपी योगेश स्वतः आणि त्याच्या कारमध्ये बसलेल्या भरती सचिन पिंजण (वय 30, रा. देहूगाव) या देखील गंभीर जखमी झाल्या आहेत. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

तिसरी घटना मंगळवारी (दि. 18) सकाळी आठ वाजता पुणे-मुंबई महामार्गावर जकात नाक्याजवळ घडली. याप्रकरणी लक्ष्मण नागनाथ म्हस्के (वय 57, रा. निगडी) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अक्षय बारमुख (वय 26, रा. तळेगाव दाभाडे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लक्ष्मण मंगळवारी सकाळी जुना पुणे-मुंबई महामार्गावर जकात नाक्याजवळ रस्ता ओलांडत होते. त्यावेळी आरोपी दुचाकीवरून जात असताना त्याने लक्ष्मण यांना जोरात धडक दिली. त्यात ते जखमी झाले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

चौथी घटना 31 डिसेंबर 2019 रोजी दुपारी साडेपाच वाजता पिंपळे सौदागर येथे घडली. याप्रकरणी यशवंत हरिभाऊ काटे (वय 68, रा. पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, चंद्रकांत भगवानदास शर्मा (वय 51, रा. पाषाण-सुस रोड, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या एम एच 14 / सी आर 9447 या कारने फिर्यादी यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात फिर्यादी जखमी झाले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

पाचवी घटना बुधवारी (दि. 19) दुपारी सव्वापाच वाजता पुणे-नाशिक रोडवर आंबेठाण येथे घडली. शंकर बारकू गोपाळे (वय 35, रा. आडगाव, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आर जे 09 / जी बी 5562 या कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील बारकू राघू गोपाळे (वय 75) हे आंबेठाण येथे पुणे-नाशिक महामार्गावर रस्ता ओलांडत होते. यावेळी एका कंटेनरने त्यांना धडक देऊन जखमी केले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.