Ashadhi Wari 2022 : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर समितीने घेतला मोठा निर्णय; आषाढीवारी आधीच मंदिरात करणार ‘हे’ महत्त्वाचे बदल

एमपीसी न्यूज – पंढरपूरच्या विठ्ठल – रुक्मिणी मंदिरात मुर्तीची झीज होत असल्याचे एका वृत्त वाहिनीने निदर्शनास आणल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. शासनाने सुद्धा याचे गांभीर्य लक्षात घेत त्यावर पावले उचलली, तात्काळ एक बैठक घेत भारतीय पुरातत्व विभागाच्या पथकाला मंदिराकडे पाचारण केले. या पथकाने पाहणी करत याबाबतचा अहवाल राज्य सरकार आणि मंदिर समितीकडे सुपूर्द केला. या अहवालानुसार देवाच्या मुर्तीची झीज भरून काढण्यासाठी वज्र लेप लावण्याचा सल्ला दिला असून अनेक गोष्टींबाबत काळजी घेण्याचे यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर मंदीर समितीने एक बैठक घेतली, बैठकीत हा अहवाल गांभिर्याने घेत या अहवालावर शिक्कामोर्तब करत त्या अनुशंघाने पावले उचलण्याचे निश्चित केले. 

पुरातत्व विभागाच्या अहवालानुसार मंदिर समितीने घेतले ‘हे’ महत्त्वपूर्ण निर्णय –

राज्य शासनाच्या सूचनेनंतर लगेचच पंढरपूरच्या विठ्ठल मंदीराला भेट देत पुरातत्व विभागाने मुर्तीच्या होणाऱ्या झीजसंदर्भात काही निरीक्षणे नोंदवली आणि अहवाल लगेचच राज्य शासन आणि मंदीर समितीकडे पाठवून या गोष्टीकडे लक्ष वेधून घेतले. दरम्यान मंदीर समितीने सुद्धा यावर तातडीची पावले उचलली आहेत.

पुरातत्व विभागाच्या अहवालानुसार मुर्तीला हानिकारक ठरणारी ग्रॅनाईट फरशी तातडीने काढण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. अभिषेक करताना दूध, दही, मध आणि साखर यांचा मर्यादित स्वरूपात वापर करण्यात येणार असून अभिषेकासाठी क्षारयुक्त आरओ पाण्याचा उपयोग केला जाणार आहे. मुर्तीच्या अभिषेकाच्या वेळी देवाच्या डोक्यावरून अतिशय हळू वेगात पाणी सोडण्याचा निर्णय सुद्धा बैठकीत घेण्यात आला.

विठ्ठलाचा गाभारा लहान आहे आणि भाविकांच्या अलोट गर्दीमुळे गाभाऱ्यात मोठ्या प्रमाणात उष्णता तयार होते ज्याचा नकळत मुर्तीवर परिणाम होतो. याचे गांभीर्य लक्षात घेत याठिकाणी टेम्परचर सेन्सर बसवण्यात येणार असून मुर्तीचे तापमान साधारण 22 ते 25 डिग्री पर्यंत ठेवण्यात येणार आहे, त्यामुळे भाविकांना यापुढे मर्यादित संख्येनेच गाभाऱ्यात दर्शन घेता येणार आहे.

दरवेळी भाविकांना आकर्षून घेणारी फुलं आणि फळांची सजावट यापुढे गाभारा आणि चौखांबीच्या बाहेर करण्याचा विचार करण्यात येत आहे, शिवाय रुक्मिणीमातेच्या मुर्तीच्या पायाला झालेली झीज भरून काढण्यासाठी वज्रलेप लावण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबत पुरातत्व विभागाकडून वेळ नक्की केली जाणार असल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, मुर्तीची होणारी झीज वेळीस निदर्शनास का आणून दिली नाही असा सवाल करत जबाबदार व्यक्तींवर कारवाईचा बडगा उचलण्याचा निर्णय यावेळी बैठकात घेण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.