Pimpri news: ऑक्सिजनची आवश्यकता असलेले रुग्ण वाढले

तुटवडा निर्माण झाल्याने खासगी रुग्णालयांसमोर गंभीर परिस्थिती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यात गंभीर, अति गंभीर रुग्णांचे प्रमाण जास्त असून या रुग्णांना ऑक्सिजनची गरज लागत आहे. ऑक्सिजनची मागणी वाढली असताना शहरातील खासगी रुग्णालयात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे.

रात्री, अपरात्री साठा संपत आहे. रुग्णांवर उपचार करणे डॉक्टर आणि रुग्णालयांसाठी अडचणीचे झाले आहे. नवीन रुग्ण दाखल करून घेण्यातही रुग्णालयांना अडचणी येत आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. या रुग्णालयांना ऑक्सीजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. ऑक्सिजन उपलब्ध होण्यासाठी खासगी रुग्णालयांकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र मागणी वाढल्याने ऑक्सिजन उपलब्ध होण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे रुग्णालयांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

ऑक्सिजन कमी झाल्यानंतर रुग्ण रुग्णालयात धाव घेताहेत – डॉ. श्रीकृष्ण जोशी

_MPC_DIR_MPU_II

निगडीतील लोकमान्य हॉस्पिटलचे डॉ. श्रीकृष्ण जोशी म्हणाले, “ऑक्सिजनची आवश्यकता असलेलेच कोरोनाचे सगळे रुग्ण येत आहेत. रुग्ण घरी चार ते पाच दिवस अंगावर काढत आहेत. ऑक्सिजन कमी झाल्यानंतर रुग्णालयात धाव घेत आहेत. त्यामुळे पळापळ चालली आहे. रुग्णांनी सुरुवातीपासून काळजी घेणे आवश्यक आहे. एकदम अचानक रुग्णालयात जायचे म्हटले तर बेड मिळणार नाहीत. मोठी अराजकता माजेल. महापालिकेने मदत केली आहे. ऑक्सिजनचे सिलेंडर भरून येत आहेत. परवा ऑक्सिजनची मोठी कमतरता होती. सिलेंडर मिळत नव्हते. ऑक्सिजनची कमतरता आहे पण महापालिकेने मदत केली आहे”.

बिर्ला रुग्णालयाचा ऑक्सिजन निर्मितीचा स्वतंत्र प्लँट – रेखा दुबे

चिंचवड येथील आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या सीईओ रेखा दुबे म्हणाल्या, “आमचा लिक्विड ऑक्सिजन गॅस प्लँट आहे.  बँकअप प्लँट देखील आहे. दोन टँकर उपलब्ध आहेत. त्यामुळे ऑक्सिजनची समस्या नाही. बिर्ला रुग्णालयात 350 रुग्ण उपचार घेत आहेत. ऑक्सिजनची पुरेशी उपलब्धता आहे”.

“ऑक्सिजनचा सध्या मोठा तुटवडा आहे. जेथे मिळेल तेथून ऑक्सिजन आणला जातोय. परंतु, आवश्यक तेवढा ऑक्सिजन मिळत नाही. ऑक्सिजनचे दर प्रचंड वाढले आहेत. चार हजारापर्यंत मिळणारा सिलेंडर आता 15 हजार रुपयांना मिळत आहे. 250 रुपयांना रिफलिंग करून मिळायचे, आता 800 रुपये घेतले जात आहेत. बाजारात ऑक्सिजनची कमतरता असल्याने सर्वच दर वाढले आहेत. रुग्णांकडे लक्ष द्यायचे की ऑक्सिजनसाठी धावाधाव करायची असा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झाला आहे”, असे  भोसरीतील ओम हॉस्पिटलचे डॉ. अशोक आगरवल म्हणाले.

“ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होत नाही.  हॉस्पिटलवाले प्लांटवर जातात. पण, त्यांना ऑक्सिजन भरू दिला जात नाही. परिस्थिती गंभीर आहे. नक्की काय चालले हे समजत नाही.  ऑक्सिजन तयार करणाऱ्यांना कच्चा माल मिळत नाही. त्यामुळे उत्पादन होत नाही. परिणामी, रुग्णालयाला सप्लाय होत नाही. ऑक्सिजन मिळेल यावर आम्ही बिनधास्त नसल्याचे” आकुर्डीतील स्टार हॉस्पिटलचे डॉ. प्रमोद कुबडे यांनी सांगितले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.