PCMC : महापालिका तिजोरीत 660 कोटींचा मालमत्ता कर जमा

एमपीसी न्यूज –  चालू आर्थिक वर्षात आजपर्यंत 660 कोटींहून ( PCMC) अधिक कर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. यामध्ये तब्बल 400 कोटींचा ऑनलाईन स्वरुपात नागरिकांनी कराचा भरणा केला आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीमध्ये तब्बल सहा लाख नोंदणीकृत मालमत्ता आहेत. यामधील महापालिकेच्या हद्दीतील 18 झोन पैकी 11 झोनमध्ये मालमत्ता सर्वेक्षणाचे काम सुरु झाले आहे. याबरोबरच तब्बल 3,76,632 मालमत्तांना भौगोलिक क्रमांक सुध्दा देण्यात आले असून 65,000 मालमत्तांची अंतर्गत मोजणी सुध्दा करण्यात आलेली आहे. अंतर्गत मोजणी करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये ज्या नव्या मालमत्ता आढळणार आहेत त्यांना मालमत्ता कराची आकारणी करण्यात येणार आहे.

Pimpri : लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पुण्यस्मरणानिमित्त अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिर

मालमत्ता सर्वेक्षणामधूल मालमत्तांची संपूर्ण माहिती जमा केली जात आहे. या अभियानामार्फत अत्याधुनिक नकाशे प्रणालीद्वारे ब्लॉकची निर्मिती करून मालमत्तांना विशिष्ट मालमत्ता क्रमांक (यूपिक आयडी – युनिक प्रॉपर्टी आयडेंटिफिकेशन कोड) देण्यात येत आहे. ज्याप्रमाणे नागरिकांना आधार क्रमांक देण्यात आला आहे, त्याप्रमाणे मालमत्तेसाठी ‘यूपिक आयडी’ मिळणार आहे. यामुळे नागरिकांना मालमत्तेसंदर्भात सर्व माहिती एकाच क्लिकवर उपलब्ध होऊन त्यांचा वेळ वाचणार आहे.

‘डिजी लॉकर’च्या धर्तीवर आता ‘प्रॉपर्टी लॉकर’ची सुविधा…!

नागरिकांना केंद्र सरकारद्वारे आपली कागदपत्रे ‘डिजी लॉकर’च्या माध्यमातून एकत्रित सुरक्षित ठेवण्याची सुविधा पुरविण्यात आली आहे. त्याच धर्तीवर महापालिका आता मालमत्तेसंदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे ‘प्रॉपर्टी लॉकर’च्या माध्यमातून सुरक्षित ठेवण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देणार आहे. ‘यूपिक आयडी’च्या माध्यमातून ही सुविधा मिळणार असून, आपल्या मालमत्तेसंदर्भातील माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. यामुळे आपल्या मालमत्तेसंदर्भात आढावा घेण्यास नागरिकांना मदत होणार आहे. नागरिकांची डिजिटल गोपनीयता जपली जाणार असून, आपली कागदपत्रे महापालिकेला सार्वजनिक करण्याचा व न करण्याचा अधिकार नागरिकांकडेच असणार आहे. अशा विषयांची सखोल माहिती करसंवादाच्या माध्यमातून शनिवारी देण्यात आली.

थकीत कराचा भरणा करुन विलंब शुल्क टाळा…!

ज्या नागरिकांनी अद्याप आपला थकीत कराचा भरणा केला नाही अशा मालमत्तांवर सध्या मालमत्ता जप्तीची नोटिस बजावून मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. त्याचबरोबर, थकबाकीदारांच्या थकीत रकमेवर 2 टक्क्यांचे विलंब शुल्क सुध्दा लागू होत आहे. त्यामुळे नागरिकांनी आपला थकीत मालमत्ता कर भरुन जप्तीची कटू कारवाई व वाढणारे 2 टक्क्यांचे विलंब शुल्क टाळावे. असे आवाहन सुध्दा कर आकारणी व कर संकलन विभागाकडून करण्यात आले आहे.

नागरिकांना आपल्या मालमत्तेची माहिती ठेवता येण्यासाठी, करामधील असमानता दूर करण्यासाठी ‘मालमत्ता सर्वेक्षण अभियाना’चा लाभ नागरिकांना होणार आहे. महापालिकेने सर्वेक्षणासाठी नेमलेले अधिकारी, महिला व सर्वेक्षणासाठी नेमण्यात आलेले कर्मचारी यांना महानगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांनी बहुमोल सहकार्य केले असून यापुढेही मालमत्तेची माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी ( PCMC)  केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.